अख्तर काझी
दौंड : स्वस्तात सोने विकत घेऊन देण्याचे अमिष दाखवून स्वतःच्या मित्राचीच तब्बल 15 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या वकील सनी बलदोटा (रा. गजानन सोसायटी, दौंड) याच्या विरोधात आज (22 मार्च) रोजी एका विधवा, वृद्ध महिलेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दौंड पोलिसात दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणीच्या पहिल्या गुन्ह्यामध्ये अद्याप फरार असलेल्या सनी बलदोटा विरोधात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सलग दुसरा गुन्हा दाखल झाल्याने येथील वकील वर्गात खळबळ उडाली आहे.
श्रीमती स्नेहलता राजेंद्र हिवाळे (रा. अमर ज्योती हाउसिंग सोसायटी, हडपसर, पुणे) यांनी त्यांची आर्थिक फसवणूक झाल्या प्रकरणी सनी बलदोटा विरोधात दौंड पोलिसात फिर्याद दाखल केली. दौंड दौंड पोलिसांनी सनी बलदोटा विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वकील सनी बलदोटा याने फिर्यादी यांची दि. 26 ऑक्टोबर 2021 ते मे 2023 दरम्यान 4 लाख 12 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. विधवा मुलीस पेन्शन भेटू शकते व ती मी चालू करून देतो असे सांगून आरोपीने फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली. फिर्यादी यांची आई श्रीमती रिबेका डोंगरे व वडील हरिश्चंद्र डोंगरे हे दोघेही जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. 1990-2018 या कालावधी दरम्यान या दोघांचाही मृत्यू झाला होता.
त्यावेळेस फिर्यादी यांच्या आईच्या बचत खात्यात काही रक्कम शिल्लक होती. ती रक्कम कायदेशीरपणे फिर्यादी यांना मिळवून देण्याचे काम सनी बलदोटाने पूर्ण करून दिले होते. नंतर आता तुमच्या पेन्शनचे कामही मी करून देतो, विधवा मुलीच्या नावाने 60 टक्के पेन्शन चालू होते अशी कामे मी करून दिली आहेत, माझ्यावर विश्वास ठेवा असे वकील सनी बलदोटा याने फिर्यादी यांना सांगितले. तसेच दिनांक 26 ऑक्टोबर 2021 रोजी त्याने फिर्यादी यांना दौंड कोर्टामध्ये बोलाविले व फिर्यादी यांची धाकटी बहीण श्रीमती रीमा काकडे यांच्या नावाने पेन्शन चालू करून असे सांगून त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड व पतीचा मृत्यूचा दाखला त्याचप्रमाणे फिर्यादी यांच्या आईचा मृत्यूचा दाखला तसेच फिर्यादी व त्यांची मोठी बहीण हेमलता पुरंदरे यांची सुद्धा आवश्यक कागदपत्रे त्याने घेतली व कामासाठीचे पैसेही रोख व ऑनलाईन (4 लाख 12 हजार रू.) स्वरूपात घेतले.
काही महिन्यांनी आपले काम होत नाही, आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आल्यानंतर फिर्यादी व त्यांच्या नातलगांनी वकील सनी बलदोटा यांच्याशी संपर्क करून कामाबाबत व दिलेल्या पैशाबाबत विचारणा केली असता तो वेगवेगळी कारणे देऊन वेळ मारून नेत होता. फिर्यादी यांच्या मुलीला फोन करून त्याने अरेरावीची भाषा वापरली. मी तुम्हाला ग्रीन सिग्नल देतो, तुम्हाला माझी कोठे तक्रार करायची करा, मला फरक पडत नाही असा दम देऊन त्याने संपर्क करणे बंद केले.
दौंड कोर्टातील काही जणांनी फिर्यादी यांना सनी बलदोटा यांच्या वडिलांना भेटण्याचा सल्ला दिला. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांच्या वडिलांना भेटून सदर प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिले. त्याच्या वडिलांनी आम्हाला आश्वासन दिले की मला थोडा वेळ द्या मी तुमचे पैसे परत करतो. परंतु त्यांनीही पैसे परत केले नाही व नंतर मी काही कारणास्तव काहीही करू शकत नाही असे सांगितले असे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत.