finance fraud – 33 महिला बचत गटातील ठेवीदारांचे हजारो रुपये घेऊन फरार झालेल्या भामट्यास दौंड पोलिसांनी केले जेरबंद



|सहकारनामा|

दौंड : (शहर प्रतिनिधी) 

स्वतंत्र मायक्रोफिन फायनान्स कंपनी (गोपाळवाडी) मध्ये वसुली एजंट असलेल्या राजीव तुकाराम सोनकांबळे (रा. सरपंच वस्ती, गोपाळवाडी) याने दौंड सह श्रीगोंदा, शिरूर येथील एकूण 33 महिला बचत गटांच्या महिला ठेवीदारांची तब्बल  86 हजार 157 रू इतकी रक्कम घेऊन पोबारा केला होता. पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रावण गुपचे व पोलीस नाईक पांढरे यांनी आरोपी सोनकांबळे यास 48 तासात नांदेड जिल्ह्यातील, कंधार(रूही) तालुक्यातून अटक केली आहे. 

सोनकांबळे यास न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

घटनेबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्वतंत्र मायक्रोफिन फायनान्स कंपनीकडून दौंड,श्रीगोंदा, शिरूर तालुक्यातील महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. राजीव सोनकांबळे हा या कंपनीचा वसुली एजंट असल्याने एकूण 33 महिला बचत गटातील ठेवीदार महिलांनी आपल्या कर्जाच्या हप्त्याची 86 हजार 157 रू इतकी रक्कम त्याच्याकडे जमा केली होती. सोनकांबळे याने ही रक्कम फायनान्स कंपनीमध्ये न भरता पोबारा केला होता. कंपनीच्या एरिया मॅनेजरने त्याच्याविरोधात दौंड पोलिसात तक्रार केल्याने दौंड पोलिसांनी सोनकांबळे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला होता.