सुधीर गोखले
सांगली : पावसा अभावी कोयना धरणात असलेल्या अपुऱ्या पाणी साठ्यामुळे धरणातून होत असलेला विसर्ग कमी करण्यात आला होता. परिणामी कृष्णा नदीपात्रातील पाणी पातळी घटली होती.
त्या अनुषंगाने पाटबंधारे विभागाने जिल्ह्यामध्ये उपसा बंदी आदेश लागू केले होते मात्र पाण्याअभावी शेतातील पिके वाळत चालली आहेत आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यास जबाबदार कोण असा प्रश्न विचारत ‘स्वाभिमानी’ शेतकऱ्यांनी काल पाटबंधारे विभागाच्या सांगली येथील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा राजू शेट्टी यांच्या नेतुत्वाखाली जोरदार आंदोलन केले या आंदोलनाचा परिणाम म्हणून पाटबंधारे विभागाने तातडीने उपसा बंदी आदेश मागे घेत असल्याचे लेखी पत्रच खा राजू शेट्टी यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
यावेळी पाटबंधारे विभागाचा भोंगळ कारभार यापुढे खपवून घेणार नाही असा सज्जड दमच अधिकाऱ्यांना भरला. यावेळी शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर शंखध्वनी केला. कोणत्याही परिस्थितीत उपसा बंदी आदेश मागे घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी ठाम भूमिका खा राजू शेट्टी यांच्यासह आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे तेथील अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आंदोलन तर या या भूमिकेमुळे पोलीस आणि आंदोलनकर्ते शेतकरी यांच्यात बाचाबाचीही झाली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा
यावेळी खा राजू शेट्टी यांनी विभागाचे वरिष्ठ अधिकारी हणमंत गुणाले यांच्याशी दूरध्वनी वरून चर्चा केली आणि तोडगा निघाला उद्या पासून (२५ जून) उपसा बंदी उठवली जाईल अशा आशयाचे पत्र त्यांनी तेथील उपस्थित अधिकाऱ्यांकरवी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना देऊ केले यावेळी खा शेट्टी म्हणाले,’सद्य स्थितीत पाण्याची सर्वत्र टंचाई आहे पावसाअभावी नदीपात्र कोरडे पडले आहे आम्हालाही याची जाणीव आहे पण पाटबंधारे विभागाने सर्वत्र सामान वागणूक ठेवावी काही ठिकाणी उपसा सुरु आहे तर कैच ठिकाणी बंदी आदेश आहेत असा दुजाभाव करू नये’ यावेळी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा, महेश खराडे यांच्यासह मोठ्या संख्येने आंदोलक शेतकरी उपस्थित होते.