अखेर शरद पवारांकडून निवृत्तीचा निर्णय मागे | पत्रकार परिषदेतील अजित पवारांच्या अनुपस्थितीवर पहा पवार काय बोलले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला असून लोकांच्या भावना आणि कार्यकर्त्यांचा मान राखून आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. या पत्रकार परिषदेला राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार हे उपस्थित नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या मात्र शरद पवारांचा राजीनामा फेटाळणाऱ्या समितीच्या बैठकीला ते सकाळी उपस्थित होते.

आपण हा राजीनामा मागे घेण्याचे कारण हे अनेक राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी आपल्याला याबाबत आग्रह केला, तसेच आपले कार्यकर्ते आणि लोकांची भावना यामुळे निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपण पक्षात असतानाच पक्षासाठी उत्तराधिकारी निर्माण करण्याची गरज आल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

अजित पवार पत्रकार परिषदेला का उपस्थित नाहीत.. आजच्या पत्रकार परिषदेला अजित पवार हे उपस्थित का नाहीत या प्रश्नावर शरद पवार यांनी, सर्वजण पत्रकार परिषदेला उपस्थित असतात का ? असा प्रतिप्रश्न पत्रकारांना केला. तसेच आपण भाकरी फिरवायचे म्हटले होते पण तवाच फिरवला असा प्रश्न त्यांना केला असता आपण भाकरी फिरवत असताना भाकरी थांबवली गेली. त्यामुळे भाकरी फिरली नाही अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.