अखेर ‘तो’ अट्टल मोबाईल चोर दौंड ‘रेल्वे सुरक्षा बल’ ने पकडलाच, मोबाईल व इतर साहित्य हस्तगत

दौंड : दौंड- पुणे व पुणे- दौंड रेल्वे प्रवासादरम्यान गाडीतील प्रवाशांचे मोबाईल फोन व किमतीऐवज चोरीला जाण्याच्या तक्रारी येत असल्याने दौंड,पुणे रेल्वे सुरक्षा बलाने (आर. पी. एफ) अशा चोरांना पकडण्यासाठी खास मोहीम आखली आहे. यासाठी त्यांनी आपल्या खबऱ्यांना या कामावर लावले आहे. या खबऱ्यांनी आपले काम चोख बजावीत एका मोबाईल चोरट्याची खबर रेल्वे सुरक्षा बल पोलिसांना दिल्याने त्यास जेरबंद करण्यात रेल्वे सुरक्षा बलाला यश आले आहे.

दिलीप तानाजी लवांडे (वय 29,रा.नि. मांडवे, ता. पाथर्डी,जि. अ. नगर) असे या आरोपीचे नाव असून त्यास दानापूर- पुणे एक्सप्रेसने दौंड कॉर्डलाईन स्टेशनवर उतरल्यानंतर त्याला पकडण्यात आले आहे. आरपीएफ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांना पकडण्यासाठी आरपीएफ पोलिसांनी कॉर्डलाईन स्टेशनवर पूर्ण लक्ष केंद्रित केलेले होते. दि.2 ऑक्टोबर रोजी दानापूर- पुणे या गाडीतून संशयित आरोपी कॉर्डलाईन स्टेशनवर उतरला. हाच प्रवाशांचे मोबाईल चोरतो अशी माहिती खबऱ्यांनी आधीच दिलेली असल्याने व त्याच्या संशयी हालचालीमुळे त्याला आरपीएफ पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत, त्यामुळे त्याला पोलिसी खाक्या दाखविण्यात आला व त्याची झडती घेण्यात आली असता त्याच्याकडे एक चोरलेला मोबाईल, ब्लेड, दोन सिम कार्ड व घड्याळ, रोख रक्कम सापडली. त्याच्याकडे सापडलेला मोबाईल बंद करून ठेवण्यात आलेला होता. तो चालू करताच त्याच्यावर फोन आला तेव्हा तो मोबाईल एका महिला प्रवाशाचा असल्याचे समजले.

प्रयागराज ते पुणे प्रवासादरम्यान मोबाईल चार्जिंगला लावला असताना तो चोरीला गेला होता असे त्या महिलेने आरपीएफ पोलिसांना सांगितले. या चोराची दौंड लोहमार्ग पोलिसांनी अधिक माहिती काढली असता त्याच्यावर नगर लोहमार्ग पोलीस स्टेशनला सुद्धा गुन्हा दाखल असून व त्याच्या विरोधात न्यायालयाने अटक वॉरंटही बजाविले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करून त्याला नगर लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

आर. पी. एफ,पो. उपनिरीक्षक बी. एम. कायगुडे, पोलीस कर्मचारी वीरेंद्र सोलंकी, एम.डी. काकड, दादा कोकले या पथकाने ही कारवाई केली आहे.