‛पारगाव’ येथील मिरवणुकीत ‛तलवार’ फिरविणाऱ्यावर अखेर ‛गुन्हा दाखल’, यवत पोलिसांची धडक कारवाई

दौंड : दौंड तालुक्यातील पारगाव (सालू मालू) येथे एका मिरवणुकीत तलवार हातात घेऊन ती बेभानपणे हवेत फिरविणाऱ्या तरुणावर यवत पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे सदर युवकाने भर चौकात तलवार फिरवून त्याचा व्हिडीओ तयार करत तो समाजमाध्यमावर प्रसिद्ध केला होता. त्यानंतर यवत पोलिसांनी सदर युवकावर गुन्हा दाखल केला आहे.

ऋषिकेश संजय ताकवणे (रा.पारगाव ता.दौंड जि. पुणे) असे आरोपीचे नाव असून त्याविरुद्ध राहुल शिवाजी गडदे (यवत पोलिस स्टेशन, पुणे ग्रामिण) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी ऋषिकेश ताकवणे याने दि.१४ मे रोजी ७:३० वाजता एका मिरवणुकीत स्वतःजवळ तलवार बाळगून ती फिरवली होती. त्यामुळे पुणे ग्रामिण जिल्ह्यामध्ये मा.जिल्हाधिकारी यांचे क्रपगक /२३२४/२०२३ अन्वये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) व (३) चे अनुसार शस्त्र बंदीचे आदेश पारित असतानाही स्वतःचे जवळ हत्यार बाळगून ते एका मिरवणुकीत फिरवले असल्याने आदेशाचा भंग झाला होता.

तसेच तलवार सारखे घातक हत्यार स्वतःजवळ बाळगणे हा कलम शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४(२५) नुसार मोठा गुन्हा ठरतो. त्यामुळे वरील आदेशानुसार तसेच कलम शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४(२५) नुसार ऋषिकेश ताकवणे याच्यावर यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. कापरे हे करीत आहेत.