बॉलिवूड ला दुसरा झटका.. ‘कर्ण’ पाठोपाठ ‘शोले’ चा ‘जेलर’ ही पडद्याआड

मुंबई : महाभारतातील कर्ण ची अजरामर भूमिका निभावणाऱ्या पंकज धीर यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधून आणखी एक दुःखाची बातमी समोर आली आहे. शोले चित्रपटातील जेलर म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते असरानी यांचे निधन झाले आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी वयाच्या 84 व्या वर्षी असरानी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

असरानी अनेक दिवसांपासून आजारी होते त्यामुळे त्यांना रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते. आज सोमवार दि. 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. असरानी यांना फुफ्फुसांचा त्रास होता. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांचे व्यवस्थापक बाबू भाई यांनी दिली आहे.

मृत्यूच्या काही तास अगोदर सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा

असरानी यांनी त्यांच्या मृत्यूच्या काही तास आधी इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टमध्ये, असरानी यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या मात्र या पोस्ट च्या काही तासांनंतरच त्यांच्या निधनाचे वृत्त आले आणि सर्वांना धक्काच बसला. आज सोमवारी संध्याकाळी सांताक्रूझ येथील शांती नगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

असरानी यांचे पूर्ण नाव गोवर्धन असरानी होते आणि त्यांचा जन्म 1 जानेवारी 1941 रोजी जयपूर येथे झाला होता. आपल्या कॉमिक टायमिंगने सर्वांना हसवणाऱ्या असरानी यांनी 1960 च्या दशकात आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली होती.असरानी यांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.