|सहकारनामा|
दौंड : (अख्तर काझी)
दौंड उपजिल्हा रुग्णालयाकडून मिळालेल्या अहवालानुसार शहर व परिसरातील कोरोना चांगलाच आटोक्यात आला असल्याचे (fight against corona) चित्र समोर येत आहे. मागील तीन दिवसांमध्ये येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये 241 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यापैकी फक्त 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तब्बल 236 जणांना कोरोना पासून दिलासा मिळाला आहे.
2 जून रोजी 54 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली त्यापैकी पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये शहरातील तीन व ग्रामीण भागातील दोघांचा समावेश आहे,दि.3 व 4 जून रोजी 187 जणांची कोरोना तपासणी केली असता या दोन्ही दिवसांमध्ये शहर व परिसरातील एकाही व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला नसल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ संग्राम डांगे यांनी दिली.
शहर व तालुक्यामध्ये प्रशासनाने लागू केलेल्या लॉक डाऊन च्या अंमलबजावणी चे पालन येथील नागरिकांनी, व्यापारी वर्गाने सहकार्य करीत योग्य रीतीने केल्याने सध्या कोरोना नियंत्रणात आल्याचे दिसते आहे. दौंड मधील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत शहरात सुरू केलेले तीन कोविड केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय व पोलीस प्रशासनाने कोरोना मुक्तीसाठी केलेले प्रयत्न व दौंड करांनी प्रशासनाला संयमी पणे दिलेली साथ या सर्व बाबीं मुळेच या ठिकाणी दिलासादायक वातावरण निर्माण होण्यास मोठी मदत झाली आहे.
शहर व परिसरातील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर अगदीच खाली आला असल्याने येथील व्यापार पेठेसाठी असणारे निर्बंध थोडे शिथिल करावेत व अत्यावश्यक सेवेतील दुकानां प्रमाणेच इतर व्यापाऱ्यांनाही त्यांची दुकाने उघडण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी अशी मागणी येथील व्यापारी वर्गाकडून होत आहे.