Fight against corona : करोनाने दौंड करांना दिला थोडासा दिलासा…४६ पैकी फक्त दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

 शहरात करोना चा संसर्ग कमी व्हावा व रुग्णांची संख्या आवाक्यात यावी यासाठी प्रयत्न करणाऱ्या येथील उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका तसेच पोलीस प्रशासनाला आज थोडे यश मिळत असल्याचे दिसत आहे.

बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ४६ संशयितांचे स्त्राव दि.२४ रोजी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते, त्यापैकी  दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एक पुरुष व एक महिलेचा यामध्ये समावेश आहे. समता नगर, संस्कार नगर या परिसरातील दोघांना संसर्ग झाला असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली आहे. 

मागील चार दिवसात तब्बल ४४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता आज  मात्र दौंड करांना दिलासा मिळाला आहे. शहराला करोना मुक्त करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका व पोलीस प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहेत, परंतु येथील खाजगी डॉक्टर्स, राजकीय नेते तसेच सामाजिक संघटनांकडून अपेक्षित असलेली मदत प्रशासनाला अद्याप मिळत नाही असे दिसते आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना जर यांची मदत मिळाली तर शहरात पसरणाऱ्या संसर्गाला ब्रेक लागू शकतो व शहर लवकर करोना मुक्त होऊ शकते.