दौंड : सातारा येथून सातारा – अहिल्यानगर एसटीने दौंड ला येणाऱ्या महिलेचे तब्बल सात तोळे वजनाचे सोन्याचे गंठण (किंमत 4 लाख 90 हजार) महिला चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी उषा अशोक भोसले (रा.राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 5, अधिकारी क्वार्टर्स, (दौंड) यांनी फिर्याद दिली. दौंड पोलिसांनी तीन अज्ञात महिलांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023,3(5),303(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची घटना दि.9 एप्रिल रोजी सायंकाळी 5:40 वाजण्याच्या दरम्यान बोरावके नगर ते गोल राऊंड (शहीद भगतसिंग चौक) दरम्यान घडली. दिनांक 9 एप्रिल रोजी फिर्यादी आपल्या मुलीसोबत सातारा – अहिल्यानगर एसटीने घरी दौंडला येत होत्या. गाडीमध्ये खूप गर्दी असल्याने त्यांनी आपल्या गळ्यातील सोन्याचे गंठण पर्समध्ये ठेवले होते. गाडी दौंड हद्दीतील बोरावके नगर येथे आली असता, फिर्यादी यांना उतरावायचे असल्याने त्या बॅग घेण्यासाठी आपल्या जागेवरून उठल्या होत्या.
त्यावेळेस त्यांच्या पाठीमागे एक अनोळखी महिला उभी होती व त्यांच्या समोर दोन अनोळखी महिला उभ्या होत्या. त्यापैकी पाठीमागील महिला फिर्यादी यांना सतत पाठीमागून धक्के देत होती. तेव्हा फिर्यादी यांनी त्या महिलेस, धक्का देऊ नकोस व्यवस्थित उभी राहा असे सांगितले. त्यावेळी त्या महिलेने फिर्यादी यांच्या हातावर रुमाल टाकलेला त्यांना जाणवला. त्यावेळेस सोन्याचे गंठण असलेली पर्स त्यांनी खांद्यावर अडकवलेली होती. गोल राऊंड आल्यानंतर फिर्यादी एसटी मधून खाली उतरत असताना, पाठीमागून धक्के देणारी ती महिला फिर्यादी यांच्या आधी एसटी मधून उतरली व पळून गेली.
ती पळत असताना फिर्यादी यांच्या मुलीनेही तिला पाहिले. एसटीतून उतरल्यानंतर फिर्यादी रिक्षाने घरी आल्या व त्यांनी आपली पर्स उघडून पाहिले असता पर्स मधील गंठण त्यांना सापडले नाही. त्यामुळे फिर्यादी आपल्या मुलीसोबत पुन्हा गोल राऊंडला आल्या तेव्हा त्या तीनही महिला तेथून निघून गेलेल्या होत्या.