Crime News
दौंड : दौंड तालुक्यामध्ये सध्या डॉक्टरांसंबंधित वेगवेगळ्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. कुठे प्रेम संबंध आणि त्यानंतर झालेले मोठे वाद, तर कुठे डॉक्टर पत्नीला मारहाण तर कुठे शासकीय व्यक्तीला मारहाण अश्या विविध घटनांमुळे दौंड तालुक्यातील डॉक्टर बातम्यांतून झळकत असताना आता पुन्हा एक नविन घटना समोर आली आहे. ही घटना आहे एका महिला डॉक्टरने हॉस्पीटलमध्ये घुसून पुरुष डॉक्टरला केलेल्या मारहाणीची.
मिळालेल्या माहितीनुसार महिला डॉक्टर अश्विनी वाळुंज यांनी फिर्यादी डॉक्टर तात्या भगवान निंबाळकर (लिंगाळी, ता. दौंड जि. पुणे) यांच्या श्री साई हॉस्पिटल मध्ये येऊन त्यांनी डॉ. तात्या निंबाळकर यांना चप्पल आणि टेबलवरील पेपरवेट ने मारहाण केली. त्यामुळे डॉ. निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून डॉ. अश्विनी वाळुंज यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. तात्या निंबाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महिला डॉ.अश्विनी वाळुंज या तात्या निंबाळकर यांच्या हॉस्पीटलच्या प्रतिक्षालयात आल्या. तेथे हॉस्पिटलच्या स्वागत कक्ष व कॅश काऊण्टर येथे कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांशी वाद केला. माझ्याकडे आलेल्या रुग्णांची मी तपासणी करीत असल्याने माझ्या कॅबिनमध्ये थांबून राहिलो. त्या दरम्यान डॉ. अश्विनी वाळुंज या अनाधिकृतपणे माझ्या कक्षात येवून माझ्याशी काहीएक संवाद न करता त्यांच्या पायातील चप्पल काढून माझ्या दिशेने फेकुन मारली. ती चप्पल माझ्या डाव्या डोळ्यावर लागली असे डॉ. निंबाळकर यांनी फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
तर त्यानतंर डॉ. अश्विनी वाळूंज यांनी टेबलवरचा प्लास्टिकचा पेपरवेट उचलून माझ्या दिशेने भिरकवला तो माझ्या डाव्या डोळ्याच्यावर कपाळावर लागला. हे सर्व झाल्यानंतर त्यांनी मला शिवीगाळ करून मी आत्महत्या करून तुमचे व हॉस्पिटल मधील सर्वांचे नावे घेवुन तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवेन अशी धमकी देऊन माझ्या सहायक डॉक्टरांनाही हाताने मारहाण करून निघुन गेल्या असल्याचे फिर्यादित डॉ. तात्या निंबाळकर यांनी नमूद केले आहे.
डॉ. तात्या निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून महिला डॉ. अश्विनी वाळुंज यांच्यावर मारहाण करणे आणि अनधिकृतपणे हॉस्पीटलमध्ये घुसने अश्या प्रकारचा गुन्हा दौंड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक डुके हे करीत आहेत.