अख्तर काझी
दौंड : दौंड तालुक्यातील हिंगणीबेर्डी येथील शेतकरी कुटुंबाची दलालासह काही जणां कडुन जमीन व्यवहारात फसवणूक करण्यात आली. तसेच या शेतकरी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांचा मानसिक छळ करण्यात आला, या सर्व जाचाला कंटाळून या शेतकरी कुटुंबामधील एकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. लक्ष्मण हरिभाऊ कोऱ्हाळे (रा.हिंगणीबेर्डी, दौंड) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी भाऊ भरत हरिभाऊ कोऱ्हाळे यांनी फिर्याद दिली आहे.
ज्या लोकांमुळे आणि ज्यांच्या जाचामुळे लक्ष्मण कोऱ्हाळे याने आत्महत्या केली अशा सर्वांच्या नावांची चिठ्ठी त्याने आत्महत्या करण्या पूर्वी लिहिली होती. ही चिठ्ठी त्याने आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल केल्याने संबंधितांविरोधात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे तालुक्यात जमीन खरेदी विक्री करणाऱ्या आणि फसवणूक करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट झाला असल्याचे समोर येत आहे.
अशी आहेत आरोपींची नावे दौंड पोलिसांनी भगवान रामचंद्र खोमणे, महेश बबन शेडगे, अशोक सिताराम जाधव, संदीप भगवान खोमणे, राहुल भगवान खोमणे, संजय रामचंद्र खोमणे, रोहित संजय खोमणे, संभाजी रामचंद्र खोमणे, तानाजी रामचंद्र खोमणे (सर्व रा.ज्योतिबानगर, हिंगणीबेर्डी, दौंड) श्रीकांत अनंता कानगुडे, नथुराम खंडू शेडगे, बायडाबाई अनंता कानगुडे, मारुती बबन शेडगे, अंकुश साधू शेडगे, आकाश गंगाराम शेडगे (सर्व रा. पुणे), बाळासाहेब चौधरी (पूर्ण नाव माहित नाही यांच्या विरोधात भा.द.वी.कलम 306, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती ठाणे अंमलदार बापू रोटे यांनी दिली.
असा घडला सर्व प्रकार.. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नथुराम शेडगे, बायडाबाई कानगुडे, अनुसया शेडगे यांची काळेवाडी मधील 2 एकर जमीन (गट नं.206) विकायची असल्याचे दलाल महेश शेडगे यांनी फिर्यादी यांना सांगितले. त्यामुळे फिर्यादी व त्यांच्या वडिलांनी या दलालाशी चर्चा करून सदरची जमीन 14 लाख रु. एकरी या भावाने विकत घेण्याचे ठरविले व इतर खर्चही खरेदीदार यांनीच करण्याचे ठरल्यानंतर फिर्यादी, त्यांचे वडील व भाऊ यांनी वेळोवेळी तीस लाख रुपये जमीन खरेदी करण्याकरिता म्हणून संबंधितांना दिले. दि. 18 जाने. 2022 रोजी संबंधितांनी केडगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सदर जमिनीचे फिर्यादी यांच्या नावावर साठेखत व कुलमुखत्यारपत्र करून दिले व सदर जमिनीची भोगवटा -1 ची तहसीलदार यांची मंजुरी आल्यानंतर जमिनीचे तुम्हाला खरेदीखत करून देतो असे सांगितले.
त्यानंतर एक वर्षाने सदर जमिनीची तहसीलदार यांच्याकडून विक्रीची परवानगी घेतली. दि. 7 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना सांगितले की, तुम्ही केडगाव येथे या, तुम्हाला खरेदीखत करून देतो. त्याप्रमाणे फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय तसेच दलाल महेश शेडगे व जमीन मालक शेडगे, कानगुडे, अशोक सीताराम जाधव हे केडगाव येथे पोहोचले. त्यावेळी दुय्यम निबंधक कार्यालया बाहेर फिर्यादी यांना सदर जमिनीचा खरेदी खताचा दस्त दाखविला व त्यावर फिर्यादी यांच्या पत्नीच्या सह्या घेतल्या. त्यानंतर एक आठवड्याने फिर्यादी यांच्या गावातील भगवान खोमणे यांनी सदर जमीन विकत घेतली असल्याचे फिर्यादी यांना समजले. त्यामुळे त्यांनी ऑनलाइन पोर्टलवर पाहिले असता फिर्यादी यांचे खरेदीखत झाले नसून साठे खत व कुलमुखत्यारपत्र रद्दलेखा झाले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
फसवणूक आणि मानसिक त्रासामुळे आत्महत्या.. त्यावेळी सदर व्यक्तींनी आपली फसवणूक केली असल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. फिर्यादी यांनी संबंधितांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क झाला नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांच्या विरोधात कोर्टात दावा दाखल केला. त्यानंतर सर्व आरोपींनी फिर्यादी यांना सदरच्या जमिनीतुन ये – जा करावयाची नाही म्हणून वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देऊन मानसिक त्रास देत त्यांचे जगणे असह्य केले. दि. 12 मार्च 2024 रोजी सायंकाळी 6 च्या दरम्यान फिर्यादी यांना त्यांच्या भावाने (लक्ष्मण कोऱ्हाळे) मोबाईल वरून कळविले की काळेवाडी, चौफुला येथे अशोक जाधव याने त्याला मारहाण केली आहे व या सर्व संबंधितांच्या सततच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर 12 मार्च रोजी रात्री 11.30 च्या दरम्यान फिर्यादी यांचे भाऊ लक्ष्मण कोऱ्हाळे (वय 35) याने वरील सर्वांच्या सततच्या त्रासाला कंटाळून व आपली फसवणूक केल्याने त्यांच्या नावाची चिठ्ठी लिहून आत्महत्या करीत असल्याबाबत हिंगणीबेर्डी ग्रामपंचायत नावाच्या व्हाट्सअप ग्रुप वर सदरची चिठ्ठी टाकली. त्यामुळे फिर्यादी यांच्या नातलगांनी व ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला असता रात्री 11.45 च्या दरम्यान फिर्यादी यांचा भाऊ लक्ष्मण याने एका लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे आढळून आले. लक्ष्मण कोऱ्हाळे याने आत्महत्या करण्यापूर्वी ज्या 16 जणांची नावे चिट्ठीमध्ये लिहून ठेवली होती त्या सर्वांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास दौंड करीत आहेत.