दापोडी येथे मेंढपाळ शेतकऱ्याची सुमारे 30 लाखांची फसवणूक, बोगस कर्ज काढून फसवणूक केल्याप्रकरणी बाळासो वाघमोडेसह 5 जणांवर गुन्हा दाखल

दौंड : दौंड तालुक्यातील दापोडी येथे  शेतकऱ्याच्या नावावर असणाऱ्या शेती क्षेत्रावर लाखो रुपयांचे बोगस कर्ज काढून त्याची सुमारे 30 लाख 13 हजार 661 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत धनसिंग रघुनाथ घुले (रा.उंडवडी, ता.बारामती, शेती दापोडी ता.दौंड) यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून बाळासाहेब हरिभाउ वाघमोडे (रा.दापोडी ता.दौंड जि.पुणे) २) भारत रघुनाथ घूले ३) लक्ष्मण उमराव थोरात ४) सुनिता भारत घुले ५) संगिता बाळासाहेब वाघमोडे सर्व रा.दापोडी ता.दौंड जि.पुणे यांच्यावर यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फिर्यादी व यवत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, वरील आरोपी बाळासाहेब हरिभाउ वाघमोडे हा फिर्यादीचा सख्खा दाजी असून आरोपी भारत रघुनाथ घूले हा फिर्यादीचा भाऊ तर आरोपी लक्ष्मण उमराव थोरात हा फिर्यादीच्या ओळखीचा तसेच सुनिता भारत घुले ही भावजय असून संगिता बाळासाहेब वाघमोडे ही फिर्यादीची सख्खी बहीण आहे. फिर्यादी हे मेंढपाळ शेतकरी असून वरील सर्व आरोपिंनी या  संगनमत करून फिर्यादी यांच्या दापोडी येथील गट. नं.२०८, २०९, २२६, २२९ या शेती गटांवर त्यांना कोणतीही माहिती न देता त्यांच्या परस्पर बँक ऑफ बडोदा शाखा (यवत ता.दौंड), विविध कार्यकारी सोसायटी (दापोडी ता.दौंड) सहकारमहर्षी मा.काकासाहेब थोरात ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. (बोरीपार्धी ता.दौंड) तसेच गजानन नागरी सहकारी पतसंस्था (यवत ता.दौंड) या बँकांचे लाखो रुपयांचे बोगस कर्ज काढले होते आणि त्याची सध्याची रक्कम ही सुमारे 30 लाख 13 हजार 661 इतकी आहे.

हे कर्ज काढताना आरोपिंकडून फिर्यादी धनसिंग घुले अथवा त्यांच्या पत्नीला याची कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती असे फिर्यादीने आपल्या फिर्यादित म्हटले असून त्यांच्या परस्पर हे सर्व कांड वरील आरोपिंनी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. यातील मुख्य आरोपी बाळासाहेब वाघमोडे हा सोसायटी सचिव संघटनेचा अध्यक्ष असल्याचे सांगितले जात असून त्याने आपल्या पदाच्या जोरावर हे सर्व घडवून आणल्याचा आरोप केला जात आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वागज हे करीत आहेत.

बोगस कर्ज प्रकरणाचा असा लागला सुगावा –  फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार,  आम्हांला ज्यावेळेस स्वतला पैशाची गरज होती तेव्हा आम्ही आमच्या दापोडी गावच्या वि.का. सोसायटी मध्ये गेलो असता तेथे आम्ही कर्जाची मागणी केली तेव्हा आम्हाला सोसायटी मधुन असे सांगण्यात आले की, तुमच्यावर पहिलेच कर्ज आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही. पहिल्या कर्जाची फेड करावी लागेल तरंच नवीन कर्ज मिळेल. पण त्यावेळेस आम्ही सोसायटी सचिव भाउसाहेब याना म्हणालो की आम्ही कर्जच घेतले नाही तर कर्ज शिल्लक राहिलंच कसे तेव्हा भाउसाहेबांनी आम्हाला सांगितले की तुमच्या नावावर 4 लाख कर्ज घेतले आहे. त्याची परतफेड करा आणि मगच कर्ज मागायला या असे म्हणाले. यावेळी आम्ही केडगाव (ता.दौंड जि.पुणे) येथील पि.डी.सी.सी बँक येथे गेलो असता तेथे आमच्या नावाचे खाते खोलून त्यावरुन कर्जाची रक्कम काढण्यात आल्याचे समजले. जर आम्ही या बँकेत खातेच उघडले नाही तर मग आमच्या पती, पत्नीच्या नावे बनावट खाते उघडून कोणी कर्ज काढले याची आम्ही खोलात जाऊन माहिती घेतली असता यामध्ये माझा दाजी बाळासाहेब हरिभाउ वाघमोडे (रा.दापोडी) हा व वरील अन्य लोक जामीनदार राहिल्याचे समजले. त्यामुळे बाळासाहेब हरिभाऊ वाघमोडे, भारत रघुनाथ घूले, लक्ष्मण उमराव थोरात,  सुनिता भारत घुले, संगिता बाळासाहेब वाघमोडे यांनी संगनमताने माझ्या परस्पर माझे व पत्नीच्या नावे बँक खाते उघडून त्याद्वारे आमच्या शेतजमिनीवर बोगस कर्ज काढून त्यातील रक्कम घेतल्याची माझी खात्री झाली असल्याचे त्यांनी फिर्यादित म्हटले आहे.