अख्तर काझी
दौंड : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या चा नारा देत गणेशाच्या प्रतिष्ठापनेनंतर आज दौंडकरांनी आपल्या आवडत्या गणपती बाप्पाला भक्तिपूर्ण वातावरणात निरोप दिला. आज सकाळपासूनच घरगुती व छोट्या मंडळांच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. घरगुती गणपती दुचाकी वर तर काही रिक्षांमधून विसर्जनासाठी आणले जात होते. बाप्पाला निरोप देण्यासाठी बच्चे कंपनी आपल्या कुटुंबीयांसमवेत विसर्जन घाटावर हजर होते. ढोल ताशाच्या तालावर नाच करीत ते बाप्पाला निरोप देत होते. दौंड नगरपालिका महावितरण कंपनी व पोलीस प्रशासनाकडून विसर्जन घाटावर जय्यत तयारी करण्यात आली होती.
पर्यावरण संरक्षणाकरिता नगरपालिका व डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्यावतीने निर्माल्य कलशाची व्यवस्था करण्यात आली होती. या कलशांमध्येच निर्मल्य टाकावे असे आवाहन करण्यात येत होते. सायंकाळी 5 वा. दरम्यान मानाच्या पाटील वाडा गणपतीचे (पालखीतला गणपती) विसर्जन मार्गावर आगमन झाले. वीरधवल जगदाळे पाटील, इंद्रजीत जगदाळे पाटील व मंडळाचे सदस्य मिरवणुकीमध्ये सहभागी होते. यावेळी गोपाळवाडी च्या लेझीम पथकाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. तूकाई नगर येथील मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधले. मिरवणुकीमध्ये पारंपारिक वाद्याच्या तालावर महिलांनी ठेकाधरीत बेधुंद होत मिरवणुकीचा आनंद घेतला.
दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव व पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाने पोलिसांचा चोख बंदोबस्त व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या संयमाने दुपारच्या सत्रातील विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली.
शिवसेनेच्या वतीने गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन
शिवसेना (ठाकरे गट, दौंड) पक्षाच्यावतीने गणेश भक्तांसाठी व विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांच्या कार्यकर्त्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.भुखे को अन्न और प्यासे को पानी या उपक्रमांतर्गत शिवसेनेच्या वतीने दरवर्षी हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येतो.
दु.12 ते रा.12 वाजेपर्यंत गणेशभक्त याचा लाभ घेतात. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शरद सूर्यवंशी, ता.अध्यक्ष अनिल सोनवणे, राजेंद्र खटी, दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे, मनसेचे सचिन कुलथे, काँग्रेसचे अशोक जगदाळे, एम आय एम चे मतीन शेख, तसेच शिवस्मारक समितीचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. मा. नगराध्यक्ष योगेश कटारिया, शिवसेनेच्या मा. नगरसेविका अनिता दळवी, शिवसेनेचे पदाधिकारी गणेश दळवी, संदीप कुलथे, संतोष जाधव, अनंता उंडे, कैलास शहा ,अभय सावंत तसेच शिवसैनिक यांनी उपक्रमाचे आयोजन केले.