जम्मू-काश्मीर :
जम्मू काश्मीर मधील शोपियामध्ये जुलै महिन्यामध्ये झालेल्या फेक एनकाउंटर प्रकरणी आता चकमकीत सहभागी असलेल्या लष्कराच्या एका कॅप्टनने 20 लाखांचे बक्षिस मिळविण्यासाठी 2 स्थानिक नागरिकांना आपलेसे करून संगनमताने तेथील 3 युवकांना ठार मारले असल्याचे न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
या बनावट फेक एनकाउंटर प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि लष्कराचा कॅप्टन भूपिंदर सिंग हा सध्या लष्कराच्या तुरुंगात असून आता त्याच्याविरोधात कोर्ट मार्शल होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जम्मू काश्मीर मधील राजौरी जिल्ह्यात असणारे इम्तियाज अहमद, अबरार अहमद आणि महंमद इबरार या 3 युवकांचा शोपियाँ जिल्ह्यातील अमशीपुरा येथे 18 जुलै रोजी फेक एनकाउंटर करून त्यांना ठार मारण्यात आले होते.
अगोदर ते अतिरेकी आहेत असे पटवून देण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र मारले गेलेले युवक हे अतिरेकी नसून त्याबाबत सोशल मीडियातून माहिती प्रसिद्ध होताच लष्कराने या गोष्टीची गंभीरपणे दखल घेत विशेष समिती नेमली आणि त्यांच्या मार्फत चौकशी केली.
यावेळी या समितीच्या अहवालात वरील कॅप्टनने लष्कराच्या अधिकारांचा भंग केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.
त्यानंतर पोलिसांनी शोपिया येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आरोपपत्र सादर करून त्यामध्ये ताबिश नाझीर आणि बिलाल अहमद लोन यांच्या संशयास्पद भूमिकेबाबतही माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनलेल्या बिलाल लोन याने आपला धक्कादायक कबुलनामा न्यायाधीशांसमोर दिला आहे.
तर पोलिसांनी आरोपपत्रात 75 साक्षीदारांची नावे आणि युवकांचे मोबाईल चॅटची माहिती सादर केली आहे.
कॅप्टन सिंग याच्या पथकात असलेल्या 4 जवानांचाही जबाब नोंदविण्यात आला आहे. त्यामध्ये संबंधित ठिकाणी 3 अतिरेकी लपले असल्याची माहिती कॅप्टन सिंग यांना मिळाली. त्यांनतर वरील पथक आणि 2 तेथील स्थानिक नागरिक त्या ठिकाणी आले. या पथकाने त्या जागेची नाकाबंदी केली त्यावेळी तेथे गोळीबाराचे आवाज ऐकू आले. आणि कॅप्टन सिंग यांनी पळून जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या 3 अतिरेक्यांना मी मारल्याचे सांगितले.
मात्र हा सर्व प्रकार केवळ 20 लाखांच्या अमिषापाई 3 जणांचे फेक एनकाउंटर करून त्यांची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी आपल्या आरोपत्रात दिली आहे.