शारदा सदन प्राथमिक शाळेतील माजी विद्यार्थी आणि शिक्षकांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथील शारदा सदन शाळेत तब्बल २५ वर्षांनी चौथी चे माजी विद्यार्थी आणि शिक्षकांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. केडगावच्या पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संचलित शारदा सदन प्राथमिक शाळा येथे तब्बल २५ वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांची पुन्हा भेट झाल्याने बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला.

या कार्यक्रमाची सुरुवात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाने करण्यात आली. त्यावेळी जसा शाळेत परिपाठ, हजेरी आणि गोष्ट सांगितली जायची तीच पद्धत यावेळी अमलात आणल्याने सर्वांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. या पाठक्रमानंतर दुपारी स्नेह भोजनाचा आस्वाद घेण्यात आला. ‘माझ्या आईचे पत्र हरवले’ हा खेळ खेळून व ‘नाच रे मोरा’ या गाण्यावर नृत्य करून माजी माजी विद्यार्थी बालपणाच्या आठवणीमध्ये रममाण होताना दिसले. कार्यक्रमाला पंडिता रमाबाई मुक्ती मिशनच्या संचालिका माननीय लॉरेन फ्रान्सिस व तसेच संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाच्या सदस्या व शाळेच्या शैक्षणिक सल्लागार माननीय लता राजीव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

माननीय संचालिका लॉरेन फ्रान्सिस यांनी माजी वि‌द्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या संस्कारांबाबत व शाळेत झालेली सुंदर जडण-घडण याबाबत माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शारदा सदन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मालविका आखाडे तसेच शिक्षकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. येत्या ११ मार्चला शाळेना १३५ वर्षे पूर्ण होत आहेत. शाळेला विद्यार्थी घडविण्याचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा या ऐतिहासिक शाळेत येण्याची संधी मिळाल्याबद्दल शिक्षकांचे आभार मानले. शाळेच्या घंटेने कार्यक्रमाची सांगता झाली.