माजी मंत्री नवाब मलिक यांना काही कालावधीसाठी जामीन मंजूर

मुंबई : माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर काही कालावधीसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. स्वास्थ्य समस्येच्या कारणावरून त्यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे.

नवाब मलिक यांच्यावर कुर्ला येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात 23 फेब्रुवारी 2022 रोजी ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांचा अनेकवेळा जामीन फेटाळण्यात आला होता. अखेर त्यांना दोन माजिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित जमीन प्रकरणात मलिक यांना अटक करण्यात आली होती. दाऊद इब्राहिम याच्याशी आर्थिक व्यवहार करणे तसेच त्याच्या बहिणीशी जमीन व्यवहार करण्यासंदर्भातील हे प्रकरण होते.

नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांची असलेली महाग जमीन अतिशय स्वस्तात कशी घेतली असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. या प्रकरणात ईडीने त्यांना अटक केली होती. त्यानंतर नवाब मलिक आधी ईडी कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडीत होते. विशेष म्हणजे ते मंत्री पदावर असतानाच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. आता त्यांना दोन महिन्यांसाठी प्रकृतीच्या कारणावरुन जामीन देण्यात आला आहे.