दौंड : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील देऊळगाव राजे, पेडगाव ,वडगाव, व शिरापूर गावठाण हद्दीतील भीमा नदीपात्रातून वाळू माफियांनी पुन्हा एकदा अवैध वाळू उपसा सुरू करून उच्छाद मांडला असल्याची बातमी सहकारनामाने प्रसिद्ध केली होती. सदरचा प्रकार दौंडचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना कळताच त्यांनी, भीमा नदी पात्रामध्ये जो कोणी अवैध वाळू उपसा करीत असेल अशा कोणाचीच गय केली जाणार नाही, अशा वाळू माफियांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल असा सज्जड दमच दिल्याने भीमा नदी पात्रात उच्छाद मांडण्यास सुरुवात केलेल्या वाळू माफियांनी नदीपात्रातील आपल्या बोटिंसह पळ काढला आहे.
भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करताना कोणी जरी सापडला त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशा सूचनाच विनोद घुगे यांनी दौंड पोलिसांना दिल्या आहेत. वाळू माफिया रात्रीची वेळ साधून या भागातील नदीपात्रातून यांत्रिक बोटीच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा करून त्याची विक्री करीत होते. चोरीच्या वाळूने भरलेले डंपर थेट दौंड शहरातूनच नेले जात होते त्यामुळे महसूल विभाग व पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे संशयाने पाहिले जात होते. सदरचा प्रकार संगणमताने तर होत नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
मात्र या चर्चेला छेद देत पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी वाळू माफियांच्या विरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे वाळू माफियांनी आपला नदीपात्रातील गोरख धंदा बंद करून पलायन केले असल्याचे दिसते आहे. या परिसरातील शेतकरी बांधवांना रात्रीच्या वेळेस वाळू माफियांचा होणारा त्रास व त्यांच्या दादागिरीला दौंड पोलिसांनी चाप लावल्याने शेतकरी वर्ग समाधान व्यक्त करीत आहेत.