पुणे : “बायोफ्लॉक तंत्रज्ञानावर आधारीत मत्स्यपालन” या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेला सोमवार, दि.20 मार्च रोजी कृषि महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे सुरूवात झाली. यावेळी कृषी महाविद्यालय, पुणे चे सहयोगी अधिष्ठाता आणि प्राचार्य डॉ.महानंद माने हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर डॉ.राजू तिबिले, प्राध्यापक (CAS), एक्वाकल्चर विभाग, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी व अश्विनी सोनवणे, सहाय्यक वनसंरक्षक, पुणे तसेच श्री.अतुल मारणे, आयोजक, किसान कृषी प्रदर्शन, पुणे हे उपस्थित होते. “कमी जागा, कमी पाणी व कमी खाद्य खर्च लागणारे बायोफ्लॉक आधारीत तंत्रज्ञान हे नवीन असून ते व्यवस्थित समजून घेऊन मत्स्यपालन केल्यास शेतक-यांना चांगला रोजगार उपलब्ध होईल” अशी आशा पुणे व छ.संभाजीनगर विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय श्री.विजय शिखरे यांनी व्यक्त केली.
तसेच “शेतीबरोबर मत्स्यपालनाचा व्यवसाय निश्चितच शेतक-यांचे उत्पन्न वाढवेल” असे डॉ.महानंद माने यांनी नमूद केले.
यावेळी तांत्रिक सत्रांमध्ये प्राध्यापक, मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी, Innovative उद्योजक व प्रगतशील शेतक-यांनी बायोफ्लॉक तंत्रज्ञानाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या दुस-या दिवशी तांबोळी hatchery पाटस येथे फ्लॉक तयारी, पाण्याची गुणवत्ता व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन, दैनंदिन तपासणी ते काढणी यावर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण हे तांबोळी अॅक्वाकल्चर सर्व्हिसेस चे तांबोळी बंधू आणि त्यांच्या टीमने दिले.
दोन दिवस चाललेल्या सदर कार्यशाळेला पुणे व छ.संभाजीनगर या दोन विभागातील 9 जिल्ह्यांमधून 125 लाभार्थी उत्स्फ़ुर्तपणे सहभागी झाले होते.