अतिक्रमण विरोधी कारवाईत ‘व्यवसाय’ गमावलेल्या व्यवसायिकांना ‘दौंड नगरपालिकेने’ पर्यायी जागा द्यावी, शिवसेनेची मागणी

दौंड शहर (अख्तर काझी)

दौंड नगरपालिकेने शहरातील रस्त्यांना अडथळा ठरणारी तसेच सरकारी जागेवरील अतिक्रमणे काढण्याची धडक मोहीम राबविली आहे. या कारवाईचा मोठा फटका हात गाड्यांवर व्यवसाय करणाऱ्यांना तसेच टपरी धारकांना बसला आहे. न.पा.ची कारवाईमुळे झाली मात्र आता या व्यवसायिकांच्या रोजी रोटीचा प्रश्न उभा ठाकला आहे. व्यवसायिकांचे व्यवसाय बंद पडल्याने यापुढे घर चालवायचे कसे असा मोठा प्रश्न या सर्वांसमोर आहे. त्यामुळे माणुसकीच्या दृष्टीने विचार करून अशा व्यवसायिकांना नगरपालिकेने व्यवसायासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

शिवसेना, पुणे जिल्हा उपप्रमुख अनिल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांची भेट घेत सदर मागणीचे निवेदन दिले.
निवेदनामध्ये असे नमूद केले आहे की, दौंड शहरामध्ये नुकत्याच केलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईमध्ये, हातावर पोट असणारे व्यवसायिक कोरोना महामारीच्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर कुठेतरी स्थिरस्थावर होत प्रपंचाचा गाडा सांभाळत असताना नगरपालिकेने 40 वर्षापासून त्या जागेवर व्यवसाय करणाऱ्यांवर देखील कारवाई केली आहे. वास्तविक रस्त्यांना अडथळा आणून, अतिक्रमण करून वर शिरजोरी करणाऱ्यांवर कारवाई करणे योग्यच आहे, परंतु रस्त्यांना अडथळा न करता व इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणाऱ्या व्यावसायिकांवर देखील कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. तरी या गोरगरीब हातगाडीवाले, फळ विक्रेते,वडापाव- पाणीपुरीवाले अशा छोट्या व्यवसायिकांना नगरपालिकेने पर्यायी जागा उपलब्ध करून त्याचे रीतसर भाडे घेऊन त्यांना व्यवसाय करण्याची एक नवीन संधी द्यावी जेणेकरून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल व नगरपालिकेस देखील उत्पन्न चालू होईल, नगरपालिकेने यावर सकारात्मक मार्ग काढावा अशी विनंती शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी मा. उप- नगराध्यक्ष हेमलता परदेशी, संतोष जगताप, नामदेव राहिंज, रोहन घोरपडे आदी उपस्थित होते.