पुणे ग्रामीण : दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथील प्रसिद्ध असणारे सद्गुरू नारायण महाराज दत्त संस्थान बेट मंदिर येथील दानपेटीतून पैशांचा अपहार करण्यात आल्याची तक्रार यवत पोलीस ठाण्यात देण्यात आली असून या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादी संजय साहेबराव शितोळे (रा.सध्या कात्रज, पुणे, मूळ गाव देऊळगावगाडा ता.दौंड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सहाय्यक मॅनजेर छगन हरीभाउ चौधरी (रा. वढाणे, ता.बारामती, जि.पुणे) यांच्यावर अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि घटना दि. १७/९/२०२१ रोजी दुपारी २:३० ते दि. ७/१०/२०२१ रोजी दुपारी ३:०० वाजण्याच्या दरम्यान घडली असून देउळगांवगाडा (ता.दौंड) या गांवच्या हद्दीत असणाऱ्या श्री.सदगुरू नारायण महाराज दत्त संस्थान बेटातील दान पेटी सहाय्यक मॅनजेर छगन हरीभाउ चौधरी (रा. वढाणे, ता.बारामती, जि.पुणे) यांनी उघडुन स्वतःच्या फायद्याकरिता दान पेटीतील अंदाजे ४ हजार रुपयांची रक्कम काढून अपहार केला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तक्रारीवरून यवत पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.