राजकीय-अब्बास शेख
दौंड तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींच्या होणाऱ्या निवडणुकांचा प्रचार आज सायंकाळी 5:30 वाजता थंडावला. तालुक्यात 11 ग्रामपंचायतींची निवडणूक लागली असताना ‘वाटलूज’ ही ग्रामपंचायत या अगोदरच बिनविरोध झाली आहे. यातील सर्वात महत्वाची समजली जाणारी केडगाव ग्रामपंचायतीचा प्रचार शिगेला पोहोचला होता हे विशेष.
आज शेवटच्या दिवशी थोरात गटाने केडगाव स्टेशन आणि परिसरामध्ये प्रचार रॅली काढत शक्तीप्रदर्शन केले. आणि केडगाव गावठाण येथील भैरोबा मंदिर या नियोजित स्थळी पार पडली तर कुल कापरे या दोन्ही गटाच्या केडगाव स्टेशन येथे होणाऱ्या सभा ऐनवेळी रद्द झाल्या. या सभा रद्द होण्यामागचे कारण मात्र समजू शकले नाही. काहींनी परवानगी नसलेल्या ठिकाणी अनधिकृत कोपरा सभा घेतल्याचे समजत असून त्याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.
केडगाव ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तीन प्रबळ उमेदवारांमध्ये मोठी चुरस असल्याचे दिसत आहे. यामध्ये थोरात गट वनिता संताजी उर्फ मनोज शेळके, कुल गट अश्विनी शिवाजी उर्फ बंडू शेळके आणि पूनम गौरव बारवकर या तीन प्रमुख उमेदवारांमध्ये मोठी चुरस असल्याचे दिसत आहे. वनिता मनोज (संताजी) शेळके यांना देशमुख मळा, केडगाव गावठाण, केडगाव स्टेशन आणि पाटील-निंबाळकर-22 फाटा, सोडनवरवस्ती येथून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा करण्यात येत असून अश्विनी शेळके यांना धुमळीचा मळा, हंडाळवाडीचा काहिभाग केडगाव गावठाण मधील कुल गटाचा पारंपारिक मतदार यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात आहे तर पूनम बारवकर यांना मुख्यत्वे धुमळीचा मळा, हंडाळवाडी, जगताप वस्ती, केडगाव स्टेशन येथील वार्डमधून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केला जात आहे.
तिन्ही उमेदवारांकडून आपणच विजयी होऊ असा दावा केला जात असला तरी येणाऱ्या सहा तारखेला निकालानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.