दौंड मध्ये भिंत अंगावर पडल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू

दौंड : आज दौंड तालुक्यात पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसत आहे मात्र कालच्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. काल अनेक ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळे घरांची पडझड झाली आहे. दौंड शहरातही जुन्या बांधकामाची भिंत पडल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार श्रीमती ताराबाई विश्वचंद आहिर (वय ७५ वर्षे, रा. दौंड) या त्यांच्या दुकानात असताना जोरदार पाऊस होत असल्याने त्यांच्या अंगावर जुन्या बांधकामाची भिंत पडली. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

सध्या पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु असून अनेक ठिकाणी जुन्या बांधकामांची पडझड होताना दिसत आहे. नागरिकांनी जुन्या, जीर्ण झालेल्या बांधकाम आणि वाड्यांपासून दूर रहावे, त्यांच्या आडोशाला उभे राहू नये असे आवाहन प्रशासकीय यंत्रणेकडून केले जात आहे.