पुणे : लोकसभा निवडणुकीला आता रंग चढू लागला आहे. काल पंतप्रधान मोदींची पुण्यात सभा झाल्यानंतर आज महाविकास आघाडीची पुण्यात सभा झाली. या सभेमध्ये शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्या एक अकेला सब पे भारी, सोबत सगळे भ्रष्टाचारी.. अब की बार चारशे पार नव्हे ‘तडीपार’ असे म्हणत मोदी, शहा आणि फडणवीस यांच्या निर्णयांवर प्रखर हल्ला चढवला आहे. भ्रष्टाचारी आणि गद्दारांना भाजप ने आपल्या सोबत घेतले आहे. ज्यांना आपण घोडे म्हणून घेतले ते घोडे नाही खेचरं आहेत आणि टरबूजाला घोडे नव्हे हातगाडी लागते असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.
लोकसभा उमेदवार सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर आणि अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची पुण्यात सभा घेण्यात आली. यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, नाना पटोले, यांची भाषणे झाली. त्यावेळी शेवटच्या अध्यक्षीय भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी फडणवीस, मोदी आणि शहांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला चढवत शरद पवारांना हे भटकी आत्मा म्हणतात मात्र हे तर स्वतः वखवखलेली आत्मा आहेत. आता जनता यांना आणि यांच्या खोट्या प्रचाराला पुरती ओळखून असल्याने यांना जनता ‘चारशे पार’ नाही ‘तडीपार’ करेल असा विश्वास व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये पुढे बोलताना, निवडणूक आयोग हा यांचा घरगडी बनलाय. ते मला माझ्या जय भवानी, जय शिवाजी यातील जय भवानी हे शब्द वगळा असे सांगत आहे. यांना भ्रष्टाचारी लोक चालतात, जो स्कॅम उघड झाला आहे त्या रेवन्नाचे हात बळकट करा असे म्हणत आहेत. रेवण्णाचे हात बळकट करून त्याला आणखी तसल्या फिल्म काढायला लावायच्या आहेत का असा प्रश्न उपस्थित केला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये त्यावेळचा जनसंघ सामिल झालेला नव्हता आणि त्यावेळची संयुक्त महाराष्ट्र समिती कुणी फोडण्याचे पाप केले असेल ते म्हणजे भाजप च्या बापाने म्हणजे जनसंघ ने केले होते अशी टिका उद्धव ठाकरे यांनी केली.