दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

अख्तर काझी

दौंड : जगाला मानवता आणि बंधुभावाचा संदेश देणारे प्रेषित हजरत मो. पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) दौंडमध्ये मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. ईद ए मिलाद निमित्ताने मुस्लिम बांधवांच्या वतीने शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. येथील शाही आलमगीर मशिदीच्या संयोजनाने व समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने जुलूस (मिरवणूक) चे आयोजन करण्यात आले होते. जुलूस मध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी होते. बच्चे कंपनीने पारंपारिक वेशभूषा परिधान करीत, उंटावर स्वार होत, जुलूस मध्ये सहभाग नोंदवीत आपला आनंद साजरा केला.

यावर्षी पहिल्यांदाच मोठ्या संख्येने महिलावर्गाने उपस्थिती दर्शविली. दुपारी ३ च्या दरम्यान आलमगीर मशीद येथून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणूक शहरातील प्रमुख चौकातून मार्गस्थ होताना येथील विविध पक्ष ,संघटनेच्या वतीने मुस्लिम बांधवांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मिरवणुकीमध्ये सामील असलेल्या समाज बांधवांना मिठाई, सरबत, आईस्क्रीमचे वाटप करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवजयंती उत्सव समितीने मुस्लिम बांधवांचा सत्कार करीत त्यांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, माजी नगराध्यक्ष इंद्रजीत जगदाळे, माजी सभापती आप्पासो पवार तसेच विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जुलूसमध्ये सामील होत मुस्लिम बांधवांना उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या तर मुस्लिम समाजाच्या वतीने या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

सायंकाळच्या नमाज पठणा आधी आलमगीर मशीद येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली. यावेळी आलमगीर मशीदीचे मौलाना अस्लम रझा यांनी शहरात भाईचारा अबाधित राहावा अशी अल्लाहकडे प्रार्थना केली. पोलीस प्रशासनाच्या चौख बंदोबस्तामुळे व सहकार्याच्या भूमिकेमुळे मुस्लिम बांधवांना आपला उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात मोठी मदत झाल्याने दौंडचे पोलीस निरीक्षक संतोष डोके व त्यांच्या सहकाऱ्यांचा संयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

त्याचप्रमाणे दि.१७ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर लगेच गणेश मंडळांनी आपले मांडव काढून मुस्लिम समाजाच्या मिरवणुकीसाठी मार्ग उपलब्ध करून दिला त्याबद्दल मुस्लिम समाजाच्या वतीने सर्व गणेश मंडळांचे आभार व्यक्त करण्यात आले.