वाघोलीत फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडले, दोन चिमुकल्या बहीण भावासह तिघांचा जागीच मृत्यू

पुणे : पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे असणाऱ्या पोलीस स्टेशन समोर फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडल्याची भयानक घटना घडली असून या घटनेमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 22 वर्षाचा तरुण, एक वर्षाची मुलगी आणि दोन वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. मृत दोन्ही चिमुकले बहिण भाऊ आहेत.

पोलिसांनी या घटनेचा आरोपी गजानन शंकर तोट्रे याला अटक केली असून तो दारू पिऊन डंपर चालवित असल्याचे तपासात समोर आले आहे. या घटनेत विशाल विनोद पवार (वय 22 वर्ष) वैभवी रितेश पवार (वय 1 वर्ष) आणि वैभव रितेश पवार (वय 2 वर्ष) या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाघोली पोलीस स्टेशन समोर असलेल्या फुटपाथवर रविवारी रात्री 9 जण झोपले होते. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास आरोपी गजानन शंकर तोट्रे याने त्याच्या ताब्यातील डंपर ने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांच्या अंगावर डंपर घातला. या भयानक घटनेमध्ये वरील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर जानकी दिनेश पवार, रिनिशा विनोद पवार, रोशन शशादू भोसले, नगेश निवृत्ती पवार, दर्शन संजय वैराळ आणि आलिशा विनोद पवार हे सहा जण जखमी झाले.

या घटनेतील जखमींना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून आरोपी डंपर चालक गजानन शंकर तोट्रे याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील सर्वजण कालच कामाच्या शोधात अमरावतीहून पुण्यात आले होते.