तिकीट तपासणीसाच्या सतर्कतेमुळे मिळाली प्रवाशाची 93 हजारांची बॅग

अख्तर काझी

दौंड : रेल्वेच्या १३९ या हेल्पलाइन नंबर वर बॅग हरवल्याची तक्रार नोंदवल्या नंतर वीस मिनिटातच प्रवाशाची ९३ हजार रोख रक्कम असलेली हरवलेली बॅग गाडीतील तिकीट तपासनीसाने शोधली. अजय लिखितकर असे या तिकीट तपासणीसाचे नाव आहे.

बारामतीमध्ये ओबीसी पर्व ने दाखवली ताकद

सोळा तारखेला शनिवारी रितेश खंडेलवाल हे इंदोर दौंड गाडीने प्रवास करत होते. ते त्यांच्या दहा ते पंधरा जणांच्या गटासह सकाळी नऊच्या दरम्यान पुणे रेल्वे स्थानकावर उतरले. गाडी निघून गेल्यानंतर त्यांना त्यांची बॅग गाडीतच राहिल्याचे लक्षात आले. बॅगमध्ये ९३ हजार रोख एक विदेशी घड्याळ, इअर पॅाडस व महत्त्वाची कागदपत्रे होती. खंडेलवाल यांनी लागलीच रेल्वेच्या १३९ या हेल्पलाइन नंबरवर तक्रार नोंदवली.

ही तक्रार गाडीतील वरिष्ठ तिकीट तपासणीस अजय लिखितकर यांना वीस मिनिटातच प्राप्त झाली. त्यांनी खंडेलवाल प्रवास करत असलेल्या डब्यात जाऊन त्यांच्या बर्थ वर बॅगेची पाहणी केली असता त्यांना ती बॅग सापडली. लिखितकर यांनी ती बॅग दौंड येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांच्या ताब्यात दिली. खंडेलवाल यांनी दौंड येथे येऊन सोपस्कार पूर्ण करून बॅग ताब्यात घेतली.