प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने दौंडमध्ये नागरिकांनीच बंद केला जड वाहनांचा रस्ता

दौंड : शहरातील ख्वाजावस्ती व उत्सव अपार्टमेंट परिसरातून होणाऱ्या जड वाहनांची वाहतुक येथील युवक आणि महिलांनी रोखली आहे. या जड वाहन वाहतूकमुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप यावेळी येथील नागरिकांनी केला आहे.

येथील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरातील जड वाहनांच्या वाहतुकीमुळे समस्या दिवसेंदिवस वाढत होत्या. अवजड वाहतुकीमुळे परिसरातील गटारीचे ड्रेनेज लाईन फुटून त्यातील घाण पाणी परिसरातील अपार्टमेंटमध्ये घुसत होते. विशेषतः उत्सव अपार्टमेंटमधील रहिवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. परिसरातील घाणीच्या साम्राज्यामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरून नागरिकांना डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा सामना करावा लागत होता. वाहतुकीमुळे उडणाऱ्या धुळीमुळे तर त्रासामध्ये आणखीनच भर पडत होती. मागील 15 ते 20 वर्षापासून हा त्रास सहन करणाऱ्या येथील नागरिकांचा सहनशीलतेचा बांध अखेर तुटला आणि येथील युवावर्ग व महिलांनी आज स्वतःच रस्त्यावर उतरून येथील होणारी जड वाहनांची वाहतूक रोखली.

आजपासून या परिसरातून जड वाहनांची वाहतूक होऊच देणार नाही असा पवित्राच स्थानिकांनी घेतला असून परिसरातून जड वाहनांची वाहतूक होऊ नये म्हणून या ठिकाणी कमान लावण्यात आली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे होणाऱ्या अवजड वाहतुकीला आम्ही आज पूर्णविराम लावला असल्याचे स्थानिक सांगत आहेत.