दौंड : शहरातील अनेक समस्यांनी सामान्य नागरिक त्रस्त असताना नगरपालिका प्रशासन सामान्य नागरिकांच्या समस्यांना गंभीर्याने घेत नाही, त्यांनी केलेल्या मागणी निवेदनांना केराची टोपली दाखविली जात आहे.
नगरपालिकेच्या या गलथान कारभाराविरोधात व नगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी झोपेचे जे सोंग घेतलेले आहे त्यांना जागे करण्यासाठी शिवसेना पक्षाच्या युवा सेनेचे जिल्हा उपप्रमुख अमोल जगताप व सामाजिक कार्यकर्ते रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली ढोल बजावो आंदोलन करण्यात आले. आज दिनांक 20 मार्च रोजी आंदोलकांनी नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मारून ढोल बजावो आंदोलन केले.
आंदोलनामध्ये जयंत पवार ,स्वप्निल ठाणगे ,राकेश भोसले, अर्जुन मंडावले, उबेद तांबोळी ,अनिस पठाण, रवी बंड, उत्कर्ष कांबळे, प्रथमेश कदम, रोहित त्रिभुवन ,अक्षय वाघमारे ,संकेत कुंभार, कुणाल बंड, देविदास श्रीसुंदर, चंद्रकांत चौबे सहभागी होते. आंदोलकांच्या वतीने नगरपालिकेला यावेळी निवेदन देण्यात आले.
शहरातील कचरा समस्या सोडविणे, तुकाई नगर येथील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, नगरपालिका इमारतीमधील गाळेधारकांची घाण पाण्याच्या त्रासातून मुक्तता करणे, शहरात शौचालय बांधणे, शहरातील बेवारस कुत्री व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे आदी समस्या नगरपालिकेने त्वरित सोडवाव्यात अशी मागणी निवेदना द्वारे करण्यात आली आहे. पुढील पंधरा दिवसांमध्ये या समस्यांवर नगरपालिकेने काम केले नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांच्या वतीने देण्यात आला आहे.