दौंड शहरातील युनायटेड ख्रिश्चन दफन भूमीमध्ये गटारीचे पाणी! ख्रिश्चन बांधवांमध्ये संतापाची लाट

अख्तर काझी

दौंड : शहरातील उपजिल्हा रुग्णालय व एसटी डेपो परिसरातील गटारी मधील घाण पाणी युनायटेड ख्रिश्चन दफन भूमी मध्ये शिरल्याने संपूर्ण दफनभूमी मध्ये घाणीचे साम्राज्य झाले आहे, थेट दफनभूमी मध्येच गटारीचे पाणी शिरल्याने समाजाच्या भावना दुखावल्या आहेत तसेच समाजामध्ये संतापाची लाट आहे. या संतापजनक परिस्थितीची कल्पना नगरपालिकेला वारंवार सांगूनही नगरपालिका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मा.नगरसेवक राजेश गायकवाड यांनी केला आहे. दफन भूमी मध्ये आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून नेहमी प्रयत्नशील असणारे राजेश गायकवाड यांनी याबाबत असे सांगितले की, दफन भूमी समोरील रस्त्या शेजारून जाणाऱ्या गटारीचे पाणी दफन भूमी मध्ये शिरले आहे ज्यामुळे संपूर्ण दफनभूमीत गटारीचे पाणी साचले असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी चालणेही मुश्किल झाले आहे, अशातच जर समाजातील एखाद्याची मयत झाली तर त्याचा दफन विधी अशा घाण पाण्यात करावयाचा का? असा प्रश्न ख्रिश्चन समाजाकडून उपस्थित केला जात आहे.न. पा. ने तत्काळ दफन भूमीतील घाण पाणी काढण्याची व्यवस्था करावी व या ठिकाणी पुन्हा गटारीचे पाणी येणार नाही यासाठी ठोस उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी राजेश गायकवाड यांनी केली आहे.