पोलीस कर्मचाऱ्यास ‛चापट’ मारल्याप्रकरणी डॉ.वंदना मोहिते यांना इतक्या दिवसांची ‛पोलीस कोठडी’

दौंड : एका पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी केडगाव येथील डॉ.वंदना मोहिते यांना रविवार पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली आहे.

डॉ. मोहिते या चारचाकी वाहनातून पुण्याच्या दिशेने जात असताना त्यांना पालखी मार्गातून वाहनासह जाण्यास पोलीस कर्मचाऱ्यांनी मज्जाव केला होता. यावेळी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून पोलीस कर्मचाऱ्यास चापट मारली होती. तसा आरोप डॉ.मोहिते यांच्यावर ठेवण्यात आला. या प्रकरणी त्यांना आज न्यायालयात हजर केले असता सरकारी वकील/अभियोक्ता ॲड.चैताली भोसले यांनी प्रशासनाची बाजू मांडताना, एक लोकसेवक आपले कर्तव्य बजावत असताना पालखी बंदोबस्ताचे अतिशय जोखमीचे काम करत असताना लोकसेवकला जोरात चापट मारून प्रशासनाचा अपमान केला असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी आरोपीच्या बाजूने ॲड.खंडागळे यांनी बाजू मांडली.

सरकारी वकील ॲड.चैताली भोसले यांनी शासनाचा आरोपीला भा.द.वि कलम 353 लावण्यामागचा उद्देश हाच आहे की प्रशासनाला काही लोक अडचणीत आणतात, कायद्याला घाबरत नाहीत आणि सदर आरोपी महिला ह्या तर स्वतः उच्चशिक्षित डॉक्टर असून त्यांनी लोकसेवाकला कर्तव्य करत असताना चापट मारली आहे असा युक्तिवाद केला. तसेच या घटनेतील अजूनही काही बाबींचा तपास करायचा असल्याने माननीय न्यायालयाकडे डॉ.मोहिते यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. ती मागणी माननीय न्यायालयाकडून मान्य करण्यात येऊन दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती या गुन्ह्यातील तपासी अधिकारी सपोनि एम.बी. तावरे मॅडम यांनी दिली.