महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दौंड रेल्वे वेंडर्स संघटनेच्या वतीने अन्नदान उपक्रमाचे आयोजन

अख्तर काझी

दौंड : ज्ञानाचे अथांग महासागर… विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या (6 डिसेंबर) निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईला चैत्यभूमी येथे जाणाऱ्या भीम भक्तांसाठी दौंड रेल्वे वेंडर्स संघटनेच्या वतीने दौंड रेल्वे स्थानकामध्ये अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला. राज्यातील कानाकोपऱ्यातून रेल्वेने मुंबईला जाणाऱ्या भीम अनुयायांच्या भोजनाची व्यवस्था संघटनेच्या वतीने करण्यात आली.

दि.5 डिसेंबर सायंकाळी 7वा.पासून रात्री 2 वाजेपर्यंत येणाऱ्या प्रत्येक गाडीतील भीम भक्तांच्या भोजनाची व्यवस्था यावेळी करण्यात आली. उपक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, राजगृह बुद्धविहाराचे अध्यक्ष राजेश मंथने, शिल्पा मंथने व सहकारी तसेच मच्छिंद्र डेंगळे, श्याम वाघमारे यांनी त्रिशरण पंचशील, बुद्ध वंदना, भीम शौर्यगाथा चे वंदन करून बाबासाहेबांना अभिवादन केले.

यावेळी दौंड रेल्वे स्टेशन प्रबंधक जयनाथ त्रिपाठी, लोहमार्ग पोलीस ,रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी, ठेकेदार गुंजन अग्रवाल, सचिन सोनवणे ,राजू सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते सचिन खरात उपस्थित होते. रेल्वे वेंडर्स संघटनेचे ज्ञानेश्वर यादव, गणेश बेसले, जुबेर शेख ,अशोक गायकवाड ,अब्दुल शेख ,विकी मकासरे आदींनी आयोजन केले. 1995 पासून संघटनेच्या वतीने सदरचा उपक्रम राबविण्यात येत आहे.