अख्तर काझी
दौंड : एकच साहेब.. बाबासाहेब असा बाबासाहेबांचा जयघोष करीत भीम अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी केली. परंपरेप्रमाणे दि. 13 एप्रिल रोजी रात्री ठीक 12 वाजता येथील डॉ. आंबेडकर चौकातील बाबासाहेबांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करीत भीम अनुयायांनी अभिवादन केले. यावेळी त्रिशरण पंचशील चे सामूहिक पठण करण्यात आले.
आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, माजी नगराध्यक्ष योगेश कटारिया, वीरधवल जगदाळे, बादशहा शेख तसेच दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी कावळे व शहरातील विविध राजकीय पक्ष, संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व समस्त आंबेडकरी जनतेस भीम जयंती च्या शुभेच्छा दिल्या. निळे ध्वज फडकवित, जय भीम चा नारा भीमसैनिकांनी सारा आसमंत दणाणून सोडला होता.
जयंतीनिमित्ताने दलित संघटनांच्या वतीने शहरात सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आले.दि.14 एप्रिल रोजी सकाळपासूनच भीम अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत होते. अभिवादन करण्यासाठी आलेल्या भीम भक्तांसाठी विविध मंडळांच्या वतीने अन्नदान, सरबत वाटप ,अल्पोपहार असे उपक्रम राबविण्यात आले.
दौंड न्यायालय, पोलीस स्टेशन तसेच नगरपालिका कार्यालयामध्ये भीम जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अधिकारी, कर्मचारी वर्गाने बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
डॉ.आंबेडकर जयंतीचे औचित्य साधित पीपल्स रिपब्लिकन पार्टी, भीम वॉरियर्स बहुउद्देशीय सामाजिक संस्था,भीमशक्ती प्रतिष्ठान तसेच समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने आमदार राहुल कुल व लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जयदीप कवाडे यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका कडूबाई खरात यांचा भीम गीतांचा ऑर्केस्ट्रा सादर करण्यात आला. दौंड पोलिसांचा नियोजनबद्ध बंदोबस्त व भीमसैनिकांचे सहकार्य या मुळे शहरातील आंबेडकर जयंती उत्साहात व शांततेत पार पडली.