‛न्यू अंबिका’ कला केंद्राचे संचालक डॉ.अशोक बाबा जाधव, सौ.जयश्री जाधव ‛पुणे रत्न’ पुरस्काराने सन्मानित

पुणे : गेल्या तीस वर्षांपासून अधिक काळ महाराष्ट्राची लोककला, लावणी जतन करत तिचे संवर्धन करण्याचे काम करणाऱ्या न्यू अंबिका कला केंद्राचे संचालक डॉ.अशोक बाबा जाधव आणि सौ.जयश्रीताई अशोक जाधव यांना पुणे रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार ‛लोकशाही’ या मराठी वृत्तवाहिनीतर्फे पुणे व परिसरातील निवडक मान्यवर व्यक्तींना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याहस्ते देण्यात आला. यावेळी युवकांचे आयकॉन दौंडचे आमदार राहुल कुल, आमदार रोहित पवार या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

पुणे रत्न पुरस्कार मिळाल्यानंतर डॉ.अशोक बाबा जाधव यांनी बोलताना आपण लोककलेचे संवर्धन करण्याचे काम करत असताना अनेक संकटे आली, परंतु काही वेळा कलेचे जतन करताना सन्मान देखील झाला असल्याचे सांगत असाच सन्मान शुक्रवारी लोकशाही ह्या मराठी न्यूज चॅनेलच्या वतीने पुणे रत्न हा पुरस्कार आणि सन्मान चिन्ह देऊन मला आणि माझ्या पत्नी जयश्री जाधव यांना गौरविण्यात आले ही आमच्या चांगल्या कामाची आम्ही पावती समजतो. असे सन्मान व पुरस्कार माझ्यासाठी आणि लावणी कला पुढे नेण्यासाठी नक्कीच प्रेरणादायक ठरत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, आमदार राहुल कूल, आमदार रोहित पवार यांचाही गौरव या कार्यक्रमात करण्यात आला.