पुणे : आम्ही फायनान्सवाले आहोत असे सांगून जर कोणी कर्ज हफ्ते थकीत आहेत या नावाखाली तुमचे वाहन थांबवून परस्पर जप्ती कारवाईच्या नावाखाली वाहन घेऊन जात असेल तर वाहन त्यांच्या ताब्यात देऊ नका तर तात्काळ पोलीस स्टेशनला कळवा असे आवाहन यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी नागरिकांना केले आहे.
पवार यांनी याबाबत माहिती देताना, फायनान्सच्या नावाखाली वाहन चोरीचे प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे त्यामुळे फायनान्सवाले जरी वाहन ताब्यात घेत असले तरी त्यांनी कायदेशीर प्रोसिजर पूर्ण केल्याशिवाय त्यांच्या ताब्यात कोणीही वाहने देऊ नयेत असे आवाहन पोनि पवार यांनी केले आहे. फायनान्सवाल्यांना सुद्धा पोलीस प्रोटेक्शनमध्ये वाहन जप्ती कारवाई करावी लागते. मात्र असे होत नसेल आणि पोलीस त्यांच्याबरोबर नसतील आणि तरीही ते वाहन हप्ते थकबाकीच्या नावाखाली जर वाहन ओढून घेऊन जात असतील तर असे वाहन कोणीही सदर फायनान्स वाल्याच्या ताब्यात देऊ नये.
तर वाहन धारकाने अशा वेळी तात्काळ पोलीस स्टेशनला 112 किंवा संबंधित पोलीस स्टेशनच्या फोनवर फोन करावा असेही नारायण पवार यांनी सांगितले आहे. फायनान्सच्या नावाखाली जबरी चोरीचे प्रकार घडत आहेत त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही फायनान्सवाल्याला परस्पर वाहन ताब्यात देऊ नये जर कोणी आला तर तात्काळ पोलीस स्टेशनला येऊन तक्रार करावी असे आवाहन पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले आहे.