हॉटेल व्यवसायासाठी तब्बल 20 लाख रुपयांची मागणी करीत विवाहितेचा छळ, घरजावयासह सासरच्या 4 जणांविरोधात दौंडमध्ये गुन्हा दाखल

अख्तर काझी

दौंड : लग्नानंतर वेळोवेळी मोठी आर्थिक मदत केल्यानंतरही हॉटेल व्यवसाय साठी तब्बल वीस लाख रुपयांची मागणी करीत विवाहितेचा सासरच्या लोकांनी छळ व मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दौंड येथे राहणाऱ्या गायत्री अभिषेक निधान यांनी सासरच्या लोकांविरोधात फिर्याद दिली आहे. दौंड पोलिसांनी पती अभिषेक अरुण कुमार निधान, सासरे अरुण कुमार सोनपाल निधान, सासू राजश्री निधान, ननंद ज्योती आकाश मलब, जावई आकाश मलब(सर्व रा. संत ज्ञानेश्वर नगर, वागळे इस्टेट ठाणे) यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दौंड पोलिसांच्या माहितीनुसार,दि.9 डिसेंबर 2020 रोजी फिर्यादी गायत्री हिचा अभिषेक याच्याशी विवाह झाला. मागणीप्रमाणे लग्नामध्ये सासरच्यांचा सर्व मानपान करण्यात आला. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी पती फिट येऊन पडला, त्याला दोन दिवस बोलताही येत नव्हते. हे पाहून फिर्यादी यांनी, मला माझ्या पतीच्या आजाराबाबत का सांगितले नाही म्हणून सासरच्या लोकांना विचारणा केली. यावरून पतीने फिर्यादी यांना मारहाण केली. त्या दिवसापासूनच फिर्यादीचा मानसिक छळ सुरू झाला. ननंद व घर जावई हेसुद्धा फिर्यादी यांना तू जाडी आहेस असे म्हणत छळ करू लागले, रात्री-अपरात्री घरातून बाहेर काढू लागले. त्यामुळे फिर्यादी यांच्या वडिलांनी जावयाला डेअरी व्यवसायासाठी दोन लाख रुपयांची मदत केली, परंतु तो व्यवसाय बुडाला. त्याबाबत विचारणा केली असता पुन्हा फिर्यादी यांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे फिर्यादी आपल्या दौंड येथील माहेरी आल्या. काही दिवसानंतर फिर्यादी यांच्या वडिलांनी त्यांना सासरी सोडून आले, परंतु सासरच्या लोकांकडून होणारा छळ काही बंद झाला नाही. त्यानंतर सासरच्या लोकांनी तब्बल वीस लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे फिर्यादी पुन्हा माहेरी आल्या व त्यांनी दौंड पोलिसात सासरच्या लोकांविरोधात तक्रार केली.