|सहकारनामा|
पुणे : (प्रतिनिधी)
“कोरोना पाठोपाठ आलेल्या निसर्गाच्या प्रकोपात मदत करण्यासाठी पुन्हा एकदा पुण्यातील डॉक्टर पुढे सरसावले आहेत, पूना सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 300 लोकांचे राशन पुरग्रस्तांकडे रवाना केले आहे.
यासंदर्भात माहिती देताना असोसिएशनचे सेक्रेटरी डॉ. चेतन म्हस्के यांनी सांगितले ” सरकार आपल्या परीने पूरग्रस्तांना मोलाची मदत करत आहे, आपण समाजाचे देणे लागतो ही भावना मनात ठेवून डॉक्टर, सामाजिक संघटना, नागरिक यांनी पुढाकार घेऊन ही मदत केलेली आहे.
पुरग्रस्तांचे नुकसान पाहता सामाजिक संस्थांनी सर्वांनी पुढाकार घेऊन मदत करावी” असे आवाहन असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट, पुणे ह्याच्या कोषाध्यक्ष डॉक्टर साधना धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
पूना सर्जिकल सोसायटी आणि ए. एम. सी पुणे यांच्या महाड येथील पूरग्रस्तांना मदत करण्याच्या आवाहनाला सर्व डॉक्टर्स व इतर सामाजिक संघटना आणि नागरिकांनी उत्तम असा प्रतिसाद दिला. 300 लोकांना पुरेल अशी दैनंदिन सामग्री गोळा झाली. असोसिएशन तर्फे डॉ. प्रतिक अजगेकर महाड यांनी हे सामान गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचे कार्य पूर्ण केले.
पूना सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते आणि असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट पुणे यांचे अध्यक्ष डॉ. दिलीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी दोन्ही असोसिएशनची कार्यकारीणी, सभासद यांचा मोलाचा वाटा आणि सहभाग होता.