अख्तर काझी
दौंड : देशाचे गृहमंत्री अमित शहा येथे आल्यानंतर, महाराष्ट्रात सर्वत्र वाढलेली गुन्हेगारी, कांदा निर्यात प्रश्न, विधानभवनात मारामाऱ्या, वाढती महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार मुक्त भारत, शेतीमालाला भाव या विषयावर त्यांच्या तोंडून काहीच ऐकू आले नाही त्यामुळे शहा जी आपसे ये उम्मीद नही थी असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. माझी भारतीय जनता पार्टी बरोबर विचारांची लढाई आहे, मतभेद आहेत, वैयक्तिक लढाई नाही असेही सुळे म्हणाल्या. दौंड दौऱ्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी आप्पासो पवार, रामभाऊ टूले, सचिन गायकवाड उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भाजपाकडून सर्वत्र दमदाटीचे राजकारण केले जात आहे. याला कुठेतरी चाप बसायला हवा. नाहीतर उद्याहे लोकांच्या घरात घुसतील आणि आम्ही हे सहन करणार नाही त्यासाठी मा. शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे, कोणीतरी कैवारी पाहिजेच. अनेक महिने मी बोलत आहे की, ईडी चा गैरवापर होतो आहे, दबावाचे राजकारण करून दहशत केली जात आहे. संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख, डी.के. शिवकुमार यांनी सगळ्यांनी मोठी लढाई दिली आहे. ते लढले आणि जिंकले सुद्धा. याउलट अशोक चव्हाण यांच्यावर लोकसभेमध्ये भाजपाने आरोप केले आणि तिसऱ्याच दिवशी त्यांचा पक्ष प्रवेश करून घेतला. त्यामुळे अशोक चव्हाण भ्रष्ट आहेत की नाही? याचे उत्तर माझ्याकडे नाही, याचे उत्तर भाजपाने दिले पाहिजे.
भ्रष्टाचार म्हणजे काय आणि भ्रष्टाचार मुक्त म्हणजे नक्की काय. भ्रष्टाचार करा आणि मुक्ती हवी असेल तर भाजपा मध्ये येऊन करा असे सध्या चालू आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपले आयुष्य कसे जगायचे हे त्यांनीच ठरवायचे असते, लढायचे की शरण जायचे. मी स्वतः संघर्षाचा मार्ग ठरविलेला आहे आणि सत्ता व अदृश्य शक्ती एका बाजूला व दुसऱ्या बाजूला संघर्ष, वडील आणि विचार असे माझे समीकरण आहे. शेतकरी बांधवांच्या प्रश्नाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, शेतकरी बांधवांना मोफत वीज द्या ना, दोन रुपये तरी कशाला घेता. शेतकरी अडचणीत आला आहे, सरसकट कर्जमाफी करावयास हवी.
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. मायबाप जनता ठरविते त्याचे काय करायचे. संपूर्ण महाराष्ट्रात ट्रिपल इंजिनचे सरकार आल्यापासून दमदाटी सुरू आहे. इंदापूरला हर्षवर्धन पाटील यांना धमकी दिली जात आहे. सत्तेत असलेल्या लोकांची ही स्टाईल झाली आहे. जो सत्तेत आहे तो कोणालाही धमकी देत आहे, ही दडपशाही कोठेतरी थांबली पाहिजे कारण देशात लोकशाही आहे, दडपशाही नाही. या देशामध्ये ,राज्यात धमकी चालणार नाही. आम्ही तरी ती सहन करणार नाही. इतकी वर्ष येथे सुसंस्कृत लोक राजकारणात होते, हा सर्व प्रकार अदृश्य शक्तीने सुरू केला आहे. तुम्ही गोडीत वागा…. आम्ही गोडीतच बोलणार, तुम्ही जर लोकांना भीती दाखवणार असाल तर त्यांचा कैवारी कोणीतरी व्हायलाच पाहिजे ना. त्यांनी धमक्या दिल्या आणि आम्ही गप्प बसलो असे कसे चालेल.
मी राजकारण फायदा, तोटा यासाठी करीत नाही. माझ्यावर कै. यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत म्हणूनच 80% समाजकारण 20 % राजकारण करते आहे. त्यामुळे फायद्यासाठी म्हणून मी कोणतेच काम करत नाही. तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडविण्यासाठी मी लोकसभेत जाते. आणि म्हणूनच भारताच्या राष्ट्रपतींनी माझ्या कामाची नोंद घेतली आहे. त्यामुळेच बारामती मतदार संघातील मायबाप जनतेचे मी आभारी मानते की त्यांनी मला लोकसभेत पाठविले. लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधक दोघांचेही महत्त्व आहे. आम्ही अनेक वर्ष सत्तेत राहिलो आहोत, विरोधकही असला पाहिजे. तगडा विरोधक हा असलाच पाहिजे तरच लोकशाही टिकते. तुम्ही पक्ष, घर फोडणार….. लोकांना भीती दाखविणार यामधून काय निष्पन्न होणार आहे. यामध्ये भरडाला जात आहे सामान्य माणूस असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.