अख्तर काझी
दौंड : दौंडमध्ये मृत अर्भक प्रकरणी आता कारवाईला वेग आला असून या प्रकरणातील महिलेची DNA चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली आहे.
दौंड-कुरकुंभ महामार्गावरील बोरावके नगर हद्दीतील जिजामाता नगर परिसरातील कचराकुंडीत मृत अर्भक व मानवी अवयवांच्या बरण्या टाकण्यात आल्याची घटना दिनांक २५ मार्च रोजी उघडकीस आली होती. पोलीस प्रशासनाने स्वतः फिर्यादी होत या गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केलेली आहे. घटनास्थळावर पोलिसांना सापडलेल्या प्रत्येक बरण्यांवर रुग्णाचे नाव व शस्त्रक्रियेची तारीख लिहिण्यात आलेली असल्याने त्या अनुषंगाने केलेल्या पोलीस तपासामध्ये या सर्व बरण्या शहरातील भंगाळे दवाखान्यातील असल्याचे निष्पन्न झाले असून दवाखान्यातील संबंधित डॉक्टरांनी ते कबूल करताना सदरचा प्रकार नजरचुकीने झाल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
सदर घटनेच्या सुरू असलेल्या तपासाबाबत बोलताना पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी माहिती दिली की, ताब्यात घेण्यात आलेल्या अर्भकाशी( मुदतीपूर्व जन्माला आलेले) संबंधित महिलेचा शोध लागला असून, या प्रकरणात तिची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. बरणीमध्ये प्रसूती पूर्व जन्माला आलेले जे अर्भक सापडलेले आहे, त्याची शस्त्रक्रिया दिनांक 30 ऑगस्ट 2020 रोजी झालेली आहे. याची माहिती दवाखान्याने त्याच दिवशी पोलिसांना कळविणे आवश्यकच होते, दवाखान्याने सदर घटनेची माहिती दिलेली आहे किंवा नाही हे पहावयाचे आहे.
प्रसुती पूर्व जन्माला आलेल्या अर्भकाचे शवविच्छेदन करणे गरजेचे होते व मृत अर्भक रुग्णाचे नातेवाईक किंवा पोलिसांकडे देऊन त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक असताना या दवाखान्याने ते अर्भक स्वतःकडेच ठेवणे चुकीचेच असल्याचे गोपाळ पवार यांनी सांगितले. इतर बरण्यामध्ये आढळलेल्या मानवी अवयवांची तपासणी उपजिल्हा रुग्णालयामार्फत करण्यात आलेली आहे. सदर प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असून दोषी आढळणाऱ्या विरोधात कारवाई होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हा सर्व संताप जनक प्रकार बायो मेडिकल वेस्ट गोळा करणाऱ्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी केलेला नसून तो येथील एका भंगारवाल्याने केला असल्याचे दवाखान्यातील डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.