राष्ट्रीय हरित सेनेतर्फे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळी भेट

दौंड : शेठ जोतिप्रसाद विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेने फटाकेविरहीत सामाजिक जाणिवांची दिवाळी याबाबत केलेल्या जागृतीनुसार प्रशालेतील इयत्ता नववी व दहावी मधील ११८ राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी व प्रशालेतील पर्यावरणस्नेही शिक्षकांनी फटाके विरहित दिवाळी साजरी करून आधारकलशात ३८५८२/- रुपये निधी संकलित केला आहे.

याच आधार निधीतून अनाथ आश्रमातील मुलांना दिवाळी पाडव्याच्या दिवशी फराळ वाटप व शिरूर येथील गोकुळ वृद्धाश्रमास भोजनासाठी मदत देण्यात आली.
भीमथडी शिक्षण संस्था संचलित शेठ जोतीप्रसाद विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेतर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी फटाके विरहित सामाजिक जाणिवांची दिवाळी ही संकल्पना राष्ट्रीय हरित सेनेचे पथक प्रमुख प्रमोद काकडे यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिली.

विद्यार्थ्यांनी परिसरातील नागरिकांमध्ये याबाबतचे प्रबोधन करून फटाके खरेदी न केल्यामुळे वाचणारी रक्कम संकलित करून प्रशालेत ठेवलेल्या आधारकलशात हा आधार निधी जमा केला. तसेच प्रशालेतील पर्यावरण स्नेही शिक्षकांनी देखील आधार कलशात रक्कम जमा केली. यावर्षी ही रक्कम ३८,५८२ रुपये एवढी जमा झाली. याच रकमेतून दरवर्षीप्रमाणे पाडव्याच्या दिवशी दौंड मधील पानसरे वस्ती येथील सडक अनाथ आश्रम संस्था, कुरकुंभ मार्गावरील अविश्री बाल सदन येथील विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ भीमथडी शिक्षण संस्थेचे चेअरमन विक्रम कटारिया, प्राचार्य सत्यदेव खाडे, उपशिक्षक रामदास होले, रामदास मखरे,श्रीनाथ ननवरे, राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी आयुष राजावत ,अनिकेत सोनवणे, विनय गडेकर, शालोमन बोर्डे ,तुलसी यादव,प्रांजल सागडे,स्टेला यमरप्पू, प्रजीत सावंत ,पुष्कर मत्रे आणि हरित सेना पथक प्रमुख प्रमोद काकडे आदीच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले.

हे या उपक्रमाचे १५ वे वर्ष होते तसेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिरूर येथील गोकुळ वृद्धाश्रमास भोजनासाठी रुपये ११,१११ देण्यात आले व उर्वरित रकमेतून प्रशालेतील गरजू विद्यार्थ्यांना स्वेटर , बुट,शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.या उपक्रमासाठी भीमथडी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी,प्रशालेतील सर्व सेवक वृंदाचे सहकार्य लाभले.