अख्तर काझी
दौंड प्रतिनिधी : दौंडमध्ये शासन आपल्या दारी महाशिबिराचे आयोजन करण्यात आले. आमदार राहुल कुल यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. दौंड- पुरंदर चे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, दौंड चे तहसीलदार अजित दिवटे, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष टेंगले ,सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, तसेच मा. नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया ,नंदू पवार, माऊली ताकवणे, हरिभाऊ ठोंबरे, गणेश जगदाळे तसेच तालुक्यातील सर्वच विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
शिबिरामध्ये आमदार कुल यांच्या हस्ते लाभार्थींना ट्रॅक्टर, अवजारे व साहित्यांचे वाटप करण्यात आले. शासनाने राबविलेल्या या उपक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व शासनाच्या विविध योजनांची माहिती घेतली. आमदार राहुल कुल म्हणाले, लाभार्थींना कमीत कमी कालावधीमध्ये योजनांचा लाभ देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. राज्य शासनाच्या योजना याची अंमलबजावणी येथे होती आहे, परंतु प्रमुखांना सूचना आहे की केंद्र आणि राज्याच्या खूप योजना आहेत आणि लाभार्थींची संख्याही मोठी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून विविध योजनांचा त्यांना लाभ मिळवून देणे आपणाला शक्य आहे तो प्रयत्न सर्वांनी करावा. आपली व्यवस्था लोकांसाठी आहे. काही चुकत असेल तर ते तातडीने दुरुस्त करावे. लोकांना सेवा देण्यासाठी आपण सर्व पदावर आहोत ,अडवणूक करण्यासाठी नाही याची जाणीव ठेवून लोकांचे प्रश्न तातडीने सोडविण्याची व्यवस्था कायमस्वरूपी लागली पाहिजे, ती लागत नाही म्हणूनच आपल्याला अशा प्रकारचे कार्यक्रम घ्यावे लागतात.
योजनांसाठी सर्वच विभागाला योग्य तो निधी उपलब्ध आहे हे नागरिकांना पटवून सांगा. लोकांना चुकीचा त्रास कोणी देणार नाही याची काळजी ही सर्वांनी घेतली पाहिजे. आम्ही तुमच्या मदतीला आहोत परंतु ती मदत याकरिता आहे की, शेवटच्या लाभार्थीला लाभ देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे आणि ती पूर्ण करणे तुमचे कर्तव्य आहे याची जाणीव आमदार राहुल कुल यांनी अधिकारी वर्गाला करून दिली.