दौंड : दौंड तालुक्यातील वाखारी येथे असणाऱ्या हॉटेल निर्माण जवळ एका ट्रक मधील डिझेल ची चोरी करून चारचाकी वाहनातून पळ काढणाऱ्या २ चोरट्यांना पकडण्यात केडगाव पोलिसांना यश आले आहे. सनी दीपक रणधीर (मूळ रा. वरवंड, सध्या राहणार उरुळी कांचन) आणि किरण विठ्ठल काकडे (रा. कदम वाक वस्ती, लोणीकाळभोर) अशी या दोन आरोपींची नावे असून फरार झालेल्या २ चोरट्यांचा शोध सुरु आहे. पकडलेल्या वरील २ आरोपिंना न्यायालयाकडून ३ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि.१२ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजता वाखारी (ता. दौंड.जि. पुणे) या गावच्या हद्दीत असलेल्या हॉटेल निर्माण च्या पुर्वेस चार चोरट्यांनी तेथे उभ्या असलेल्या टाटा कंपनी ट्रक नंबर (एम.एच. १४- बी.जे. ५८८६) मधून अंदाजे १०० लिटर डिझेल चोरी केले. ते डिझेल त्यांनी पोलो गाडी नंबर (एम एच १२ के. टी ३९५३) या गाडीमध्ये ठेवून ते पसार झाले.
आपल्या वाहनातून कुणीतरी डिझेल चोरी करतेय याची चाहूल फिर्यादी नितीन पर्वती शेळके यांना लागल्यानंतर त्यांनी आपले चुलते संजय शेळके यांना उठवून पोलो गाडीचा पाठलाग केला. याची माहिती त्यांनी यवत पोलिसांना दिल्यानंतर यवतचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक बावकर, सहा. फौजदार बाळासाहेब गाडेकर, पोना विकास कापरे, विशाल जाधव, भोसले यांनी वरील दोन आरोपिंना वाहनासह पकडले तर दोन आरोपी हे फरार झाले आहेत. पकडलेल्या दोन आरोपिंना न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.अधिक तपास पोलीस नाईक कापरे करीत आहेत.