अब्बास शेख
पुणे : पुणे शहरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. अनेक प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले असून एमआयएम या पक्षाकडूनही पुणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक व माजी स्थायी समिती अध्यक्ष अनिस सुंडके यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
अनिस सुंडके यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर हे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. धंगेकर यांच्यामागे मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतदार आहे मात्र आता एमआयएम ने अनिस सुंडके यांना उमेदवारी दिल्याने मुस्लिम मते विभागली जाण्याचा धोका वाढला आहे. अगोदरच वंचित ने वसंत मोरे यांना उमेदवारी देऊन धंगेकरांचे टेंशन वाढवले आहे. या मत विभागणीचा फायदा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अनिस सुंडके यांच्या उमेदवारीची घोषणा एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या आदेशावरून एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद येथे केली. लोकसभा उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर औरंगाबाद येथून अनिस सुंडके हे पुण्यामध्ये आले त्यावेळी त्यांनी प्रथम पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपल्याला एमआयएम च्या वतीने लोकसभेची उमेदवारी देण्यात आल्याचे सांगितले. यावेळी एमआयएम पक्षाचे शेकडो कार्यकर्ते आणि अनिस सुंडके यांना मानणाऱ्या लोकांनी मोठा वर्ग डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी गर्दी केली होती.
नाना पेठ येथील त्यांच्या निवास्थानी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे वाटप केले. यावेळी एमआयएम पक्षाचे पुणे शहर युवक अध्यक्ष शाहिद शेख, पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघाचे अध्यक्ष विलास कांबळे, उपाध्यक्ष मोबीन खान , पुणे शहर महिला उपाध्यक्ष सुमय्या पठाण, त्रिशाला गायकवाड, इमाम शेख, रोशनी शेख, सय्यद कुतबुद्दीन, शोहेब शेख, इरफान शेख आदि पदाधिकारी उपस्थित होते.