राहुल अवचर
देऊळगाव राजे : देऊळगावराजे येथिल कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर दौंड आणि श्रीगोंदा तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीचे सिंचन अवलंबून आहे. परंतु सदर बंधाऱ्याची आर्वी (ता.श्रीगोंदा) या बाजूला असणाऱ्या सांडव्याची भिंत पुरात कोसळल्यामुळे बंधाऱ्यात पाणी साठवणूक होण्यास अडचण निर्माण होत आहे त्यामुळे परीसरातील शेतीला पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे.
मागील काही वर्षापासून हा बंधारा नादुरुस्त झाल्यामुळे या ठिकाणी पाणी साठत नसून आलेले पाणी तसेच पुढे वाहून जात आहे. पाणी साठवणूक होत नसल्याने या परिसरातील शेतीसाठी पाणी पुरत नाही. बंधाऱ्यांची सांडव्याची भिंत बांधण्यात यावी यासाठी देऊळगाव राजेचे सरपंच स्वाती गिरमकर व माजी सरपंच अमित गिरमकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे भिंतीच्या दुरुस्तीची निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
देऊळगाव ग्रामपंचायतसह पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील दहा ग्रामपंचायतीनि सांडवा भिंत नवीन बांधण्यासाठी, दुरुस्तीसाठी मागणी केली आहे. लवकरच या ठिकाणी नवीन भिंत बांधण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितीत शेतकऱ्यांना दिले आहे.