दरोडे, चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने पोलीस चौकीची मागणी

अख्तर काझी

दौंड : दौंड -गोपाळवाडी रोड परिसरातील भवानीनगर, शिवराज नगर, गजानन सोसायटी मध्ये दरोडेखोरांनी एकाच रात्रीत चार घरांमध्ये घुसून लाखोंचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडल्याने परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक जीवराज पवार, राजेश गायकवाड व ज्योती राऊत यांनी सरपंच वस्ती येथे पोलीस चौकीची मागणी केली आहे. दौंड चे पो. निरीक्षक विनोद घुगे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
दौंड-गोपाळवाडी रोड परिसरात मागील काही वर्षात लोकवस्ती झपाट्याने वाढली आहे. वाढत्या लोकवस्ती प्रमाणेच या परिसरातील गुन्हेगारीही वाढली आहे. महिलांची छेडछाड करणे, भररस्त्यात मारामाऱ्या करणे, तसेच दरोडे, घरफोड्यांचे प्रकारही या परिसरामध्ये अधून मधून होतच असतात. अशा घटनांमुळे येथील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे, म्हणूनच नगरसेवकांनी परिसरातील सरपंच वस्ती येथे कायमस्वरूपी अशा पोलीस चौकी ची मागणी केली आहे. या परिसरासाठी पोलीस चौकी मंजूर आहे, काही दिवस पोलीस चौकी सुरू सुद्धा करण्यात आली होती. मात्र कोणतेही कारण नसताना चौकी अचानक पणे बंद करण्यात आली आहे. सदर भागातील वाढत्या शहरी कारणामुळे व या ठिकाणी होत असलेले गैरप्रकार पाहता, घरफोड्या, दरोड्यांच्या घटनांचा विचार करता येथे पोलीस चौकी असणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
दि.16 ऑक्टोबर रोजी याच सरपंच वस्ती परिसरातील घरांमध्ये घुसून, पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण करून, लाखो रुपये लुटून नेण्यात आले, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण होणे सहाजिकच आहे. त्यामुळे पोलीस चौकी तर द्याच पण या परिसरात रात्रीची पोलिसांची गस्तही वाढवा अशी मागणी नगरसेवकांसह नागरिकांकडून करण्यात येत आहे.