अख्तर काझी
दौंड : दौंड-कुरकुंभ मार्गावरील बोरावके नगर हद्दीतील जिजामाता नगर येथील कॅनॉल लगतच्या कचराकुंडीत नवजात मृत अर्भके सापडली असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. याबाबत स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्याने सदरचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
या घटनेची खबर मिळताच दौंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व अर्भके ताब्यात घेतली असल्याची माहिती मिळत असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. मृत अर्भके कचराकुंडीत सापडल्याची माहिती संपूर्ण शहरात पसरल्याने एकच खळबळ माजली आहे. सदरच्या धक्कादायक व संतापजनक घटनेमुळे येथील प्रस्तुती करणारे दवाखाने संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत.
याबाबत दौंडचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी सहकारनामाशी बोलताना, सदर ठिकाणी बरनीमध्ये एक मृत अर्भक सापडल्याची पुष्टी केली असून बाकी अन्य बरण्यांमध्ये शस्त्रक्रिया करून काढण्यात आलेले मानवी अवयवांचे तुकडे सापडल्याचे सांगितले आहे. तसेच या प्रकरणाबाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत असल्याचे सांगितले आहे.
दौंड-कुरकुंभ मार्गालगतच्या परिसरातच मृत अर्भके सापडल्याने ही अर्भके बाहेरून कोणीतरी या ठिकाणी आणून टाकली असल्याचा संशय सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे.