दौंड : सहकारनामा
शिवसेना दौंड यांचे वतीने दौंड तहसिल कार्यालयासमोर पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी शिवसैनिक व पदाधिकारी यांनी केंद्र सरकारने तात्काळ इंधन दरवाढ कमी करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करत दौंड शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर, पदाधिकारी, शिवसैनिक यांनी दौंड तहसिलदार यांना लेखी निवेदन दिले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास दिवेकर, शिवसेना दौंड शहर प्रमुख आनंद पळसे, महिला संघटिका छायाताई जगताप, स्वातीताई ढमाले, शिवसेना उप तालुका प्रमुख नवनाथ जगताप, विजयसिंह चव्हाण, दौंड शहर संघटक अजय कटारे, युवा सेना तालुका समन्वयक समीर भोईटे, विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख विराज भोसले, विभाग प्रमुख अभिजित डाळिंबे, काका परदेशी, दौंड उपशहर प्रमुख प्रसाद कदम, दिपक चितारे, अक्षय घोलप शाखाप्रमुख आबासाहेब देवकते, दिपक भंडलकर, केतन लवांडे, गणेश पळसे, संतोष पळसे, शाम फुटाणे आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी पासलकर म्हणाले की, क्रूड ऑइलचा दर प्रति बॅलर ७० डॉलर असताना पेट्रोलचा दर ९३ रुपये आणि डिझेलचा दर ७५ रुपयांपेक्षा जास्त करून केंद्रातील भाजप सरकार गरीबांच्या खिशावर दरोडा टाकत असून, भांडवलदारांना मदत करीत आहे. कोरोना काळात रोजगार गेल्याने सामान्य जनता आधीच बेरोजगारीशी लढा देत असताना केंद्र सरकार कडून होणारी अन्याकारक पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे उद्योग व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत.
गेल्या दोन महिन्यापासून घरगुती गॅस दरवाढीच्या मुळे सामान्य गृहिणींना कौटुंबिक खर्च भागविणे अशक्य होत आहे. सरकारने ही मनमानी त्वरीत थांबवून इंधन दरवाढ त्वरित माघारी घ्यावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने यापुढे आणखी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा पासलकर यांनी यावेळी दिला.