दौंड शहर : सहकारनामा ऑनलाइन
दौंड शहर व परिसरातील शेकडो कोरोना बाधित रुग्णांना वेळेत व योग्य उपचार देऊन त्यांना कोरोना मुक्त करण्यात बहुमूल्य योगदान देणारे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे व डॉ. विष्णू मुंडे यांना अखिल भारतीय मराठा महासंघ व डॉक्टर पानसरे हॉस्पिटल यांच्या वतीने कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.
डॉक्टर पानसरे हॉस्पिटल संचलित श्री साई कोविड सेंटर चे उद्घाटन डॉ.डांगे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी डॉ डांगे व डॉ मुंडे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
आपण सर्वच सध्या कोविड या जागतिक महामारी विरोधात लढत आहोत. महामारी आटोक्यात येण्यासाठी सर्वजण प्रयत्न करीत असतानाच डॉक्टर सुभाष पानसरे यांनी सुद्धा आपल्या दवाखान्यात कोविड सेंटर सुरू करण्याचा जो धाडसी निर्णय घेतला आहे तो कौतुकास्पद आहे असे डॉक्टर डांगे म्हणाले.
कोविड सेंटर मध्ये रॅपिड अँटी जेन तपासणी,RTPCR तपासणी तसेच बाधित रुग्णांच्या उपचाराची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती डॉक्टर पानसरे यांनी यावेळी दिली. या प्रसंगी डॉ. ज्योती पानसरे, आदिनाथ थोरात, प्रसाद गायकवाड, विक्रम पवार, डॉ. चंद्रकांत भागवत, रमेश गाडे, प्रमोद खांगल, योगेश कराळे, रोहन घोरपडे, खंडेराव जाधव, ओंकार पानसरे, ताहेर पठाण तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सूत्र संचालन दुर्योधन जठार यांनी केले.