|सहकारनामा|
दौंड : शेतकरी बांधवांचा नाशवंत भाजीपाला, फळे दौंड तहसील कार्यालयासमोर फेकत बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. या मालाची भरपाई प्रशासनाकडून वसूल करण्याचा इशारा आंदोलनावेळी देण्यात आला.
पार्टीचे जिल्हाध्यक्ष गोरक्ष बारवकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामध्ये तालुका अध्यक्ष सुनिता अडसूळ पुष्पा बनकर डॉ दत्तात्रय जगताप रामचंद्र भागवत मयूर डेंबळकर, प्रतीक बारवकर निलेश शेंडे आदी सहभागी होते.
शेतकऱ्यांना जुन्या दरापेक्षा ही ५०% दराने रासायनिक खते व बी-बियाणे यांची मुबलक उपलब्धता करून देणे व शेतकऱ्यांच्या नाशवंत शेतीमाल विक्रीसाठी तसेच शेतीशी निगडित वस्तू खरेदीसाठी शेतीशी निगडित सर्व दुकाने व व्यवस्थापन दिवसभर सुरू ठेवण्याची मागणी दौंड तालुका बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
नाशवंत भाजीपाला, फळभाज्या व फळे आणि शेतीशी निगडित आवश्यक वस्तूंची दुकाने योग्य ते व्यवस्थापन करून दिवसभर सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, तातडीने नवीन पीक कर्ज वाटप करण्याचे संबंधित बँकांना आदेश द्यावेत, बोगस बियाणे विक्री किंवा कृत्रिम तुटवडा निर्माण करून चढ्या दराने खते बी-बियाणे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर तात्काळ कार्यवाहीचे आदेश देऊन त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत, केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करण्यात यावे आदि मागण्यांसाठी सदरचे आंदोलन करण्यात आले असल्याचे गोरक्ष बारवकर यांनी सांगितले.