दौंड : (अख्तर काझी)
दौंड नगरपालिकेच्या महात्मा फुले भाजी मंडई चा ताबा सध्या शहरातील दारुडे व गर्दुले यांनी घेतला असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे.
नगरपालिकेने वैशिष्ट्य पूर्ण निधीतून जवळपास दोन कोटी रुपये खर्च करीत या भाजी मंडई इमारतीचे काम केले आहे. 2017 साली मंडईचे लोकार्पण करण्यात आले आहे. परंतु मागील एक ते दिड वर्षापासून ही भाजी मंडई भाजी विक्रेते व नगरपालिका प्रशासनातील समन्वया अभावी विनावापर पडून आहे. त्यामुळे मंडईची दुरवस्था झाली असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य झाले आहे. रात्रीच्या वेळेस तर येथील दारुड्यांनी व चरसींनी या मंडईत आपल्या हक्काचा अड्डाच बनविला असल्याचे चित्र दिसत आहे. नगरपालिकेकडून या ठिकाणी सकाळी व रात्रपाळी च्या वेळेस सिक्युरिटी गार्ड ची नेमणूक करण्यात आली आहे मात्र हे गार्ड या ठिकाणी कधीच फिरकत नाही त्यामुळे या मंडईचा वापर जो- तो आपापल्या परीने करीत आहे. मंडईत रात्रीच्या वेळेत दारुड्यांच्या होणाऱ्या पार्ट्या व येथील घाणीच्या साम्राज्यामुळे स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मंडईमध्ये भाजी विक्रेत्यांचा माल सुरक्षित राहावा या दृष्टीने नगरपालिकेने या ठिकाणी 18 गाळे बांधलेले आहेत. मात्र यांचा अद्याप रीतसर लिलाव झालेला नाही परंतु काहींनी या गाळ्यांचे कुलूप तोडून परस्पर पणे ताबा घेतलेला दिसतो आहे. नगरपालिका प्रशासनाला मात्र या गोष्टीची कल्पनाच नसल्याचे सांगितले जात आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेली, विनावापर असलेली भाजी मंडई पुन्हा सुरू करण्यात यावी तरच हा सर्व प्रकार थांबेल असे येथील काही भाजी विक्रेते गाळेधारकांनी सांगितले.
नगराध्यक्ष शितल कटारिया यांची भेट घेऊन भाजी मंडईच्या दुरवस्थेबद्दल माहिती दिली असता त्या म्हणाल्या की, मागील वर्षी शहरात कोरोना चा संसर्ग वाढलेला होता त्यामुळे भाजी विक्रेत्यांना या मंडईत न बसविता ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरतो त्या मोठ्या व मोकळ्या जागेत बसविले जात होते. मध्यंतरी या भाजी मंडई ची स्वच्छता करून घेण्यात आली होती व गाळेधारकांनी पुन्हा या मंडईमध्ये आपला व्यवसाय सुरू करावा अशा सूचना देखील करण्यात आल्या होत्या. मात्र काही विक्रेते या मंडईत न बसता बाहेर रस्त्यावरच व्यवसाय करीत आहेत. त्यांचे पाहून इतरही भाजी विक्रेते मंडईत दुकाने लावण्यास तयार नाही त्यामुळे मंडई विनावापर पडून आहे. मंडईची पुन्हा एकदा स्वच्छता करून सर्वच भाजी विक्रेत्यांना भाजी मंडई तच व्यवसाय करण्यासाठी सूचना करण्यात येणार आहे. पूर्वीसारखी पुन्हा मंडई सुरू करण्यात येईल असेही कटारिया यांनी सांगितले.
नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते बादशहा शेख यांनी याविषयी सांगितले की, आम्ही याबाबत मुख्याधिकारी यांची भेट घेऊन मंडई ची स्वच्छता व तेथील सिक्युरिटी गार्ड नेमणुकी बाबतची मागणी करू व लवकरात लवकर या मंडईतच भाजी विक्रेते गाळेधारकांना सोयीसुविधा देऊन या ठिकाणीच व्यवसाय करण्यासाठी आवाहन करू असे सांगितले.
या सर्व प्रकाराला नक्की कोण जबाबदार आहे याचे उत्तर मिळत नाही परंतु स्थानिकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागत आहे ही वस्तुस्थिती कोणीच नाकारू शकत नाही.